नवी मुंबई : प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ मधील कै. ज्ञानेश्वर शेलार ग्रंथालयात लसीकरण सुरू करण्याची लेखी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक व शिवसेनेचे माजी विभागप्रमुख रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रशासनाकडून वय वर्षे १८ ते ४४ मधील सर्व रहीवाशांना महापालिका प्रशासनाकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लसीकरण करण्यात येणार आहे. या प्रभागात महापालिकेची शाळा नाही. रहीवाशांना लस घेण्यासाठी कुकशेत, शिरवणे, माता बाल रूग्णालय येथे जावे लागते. १८ते ४४ वर्षे वयोगटातील रहीवाशांना लस देण्यात येणार असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीला येथे खतपाणी मिळण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग ८७ मधील रहीवाशांसाठी नेरूळ सेक्टर ८ मधील कै. ज्ञानेश्वर शेलार ग्रंथालयात लसीकरण सुरू करून स्थानिक रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.