संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com
मुंबई : जेष्ठ नेते एकनाथ गायकवाड हे सामान्य कुटुंबातून आलेले, सतत उत्साही, हसतमुख असायचे. आयुष्यभर ते काँग्रेसचा विचार जगले. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. धारावी या मतदारसंघाचे ते प्रतिनिधत्व करायचे. या धारावीचा विकास करणे ही एकनाथ गायकवाड यांची मूळ संकल्पना. धारावीतील सामान्य माणसाला स्वाभीमानाने जगता आले पाहिजे हे स्वप्न त्यांनी आयुष्यभर उराशी बाळगलं. त्यांच्या निधनानंतर त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली असून ते स्वप्न पूर्ण करणे हीच गायकवाड यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केल्या आहेत.
काँग्रसेचे जेष्ठ नेते माजी मंत्री स्व. एकनाथ गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मुंबई काँग्रेसने शोकसभा आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते.
या शोकसभेला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, मत्ससंवर्धनमंत्री अस्लम शेख, आ. अमिन पटेल, माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रदेश काँग्रसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, हे उपस्थित होते तर व्हीसीवरून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, संपतकुमार, सोनल पटेल, वामसी रेड्डी, मुंबई काँग्रेसे माजी अध्यक्ष जनार्दन चांदूरकर, मिलिंद देवरा. राजेंद्र गवई, कार्याध्यक्ष नसीम खान, बिरेंद्र बक्षी आदींनी सहभाग घेतला.
गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, गायकवाड हे सामान्य गरिब कुटुंबातील होते. त्यांची साधी राहणी असायची, भाषण हे मुद्देसुद व प्रभावी असायचे. त्यांच्याशी १९८५ पासूनचा स्नेह होता. सामान्य माणसांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांचे काँग्रेस विचाराशी पक्के नाते होते. त्यांची नाळ सर्वसामान्य जनतेशी जोडलेली होती. युवक काँग्रेस ते मुंबई प्रदेशचे अध्यक्ष या राजकीय कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, मंत्री म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. कोरोनावर मात करुन ते बाहेर येतील असे वाटत असताना त्यांचे निधन झाले. गायकवाड हे अत्यंत समृद्ध जीवन जगले. शेवटपर्यंत काँग्रेस विचाराला ताकद देण्याचे काम त्यांनी केले. काँग्रेसला पुन्हा चांगले दिवस आणणे हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल.
अशोक चव्हाण म्हणाले की, गायकवाड यांची प्रदिर्घ राजकीय कारकिर्द राहिली आहे. आमदार, खासदार, मंत्री म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटला. ते हाडाचे कार्यकर्ते होते, सत्तेची फळं चाखण्यास सर्व असतात पण सत्ता नसतानाही ते नेहमी सक्रीय होते. तरुणाला लाजवेल असा त्यांचा उत्साह होता. सर्वांना बरोबर घेऊन जाणारा, सहज उलपब्ध असणारा नेता अशी त्यांची ओळख होती. धारावीच्या विकासाबाबत ते नेहमी आघाडीवर असायचे. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाची मोठी हानी झाली आहे.
भाई जगताप म्हणाले की, एकनाथ गायकवाड यांच्यासारख्या जेष्ठ व अनुभवी नेत्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या अनुभवाचा नेहमी फायदा झाला. वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांच्यात १८ वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा उत्साह होता. त्यांचा उत्साह तरुण पिढीला प्रेरणादायी होता, सामान्य माणसाच्या मदतीला ते तत्पर होऊन धावून जात. यावेळी माजी खासदार दिवंगत दामू शिंगडा यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.