मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसह महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना लेखी निवेदनातून सारसोळे ग्रामस्थांची भूमिका जाहिर
नवी मुंबई : ‘सारसोळे शांतीधाम स्मशानभूमी’त नेरूळ बाहेरील कोरोनाने मृत झालेल्या मृतदेहांवर अंत्यविधी होवू देणार नसल्याची सारसोळे ग्रामस्थांची भूमिका महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री अभिजित बांगर यांना लेखी निवेदनातून स्पष्ट केली आहे.
नवी मुंबईत कोरोनाग्रस्त रूग्णांची आकडेवारी दोन्ही सत्रात वाढल्याचे आपणास आकडेवारीवरून समजले असेलच. नवी मुंबईत कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी करण्यासाठी स्वतंत्र स्मशानभूमी बनविण्यात यासाठी मी कोरोना सुरू झाल्यापासून जवळपास सव्वा वर्ष महापालिका ते मंत्रालय पाठपुरावा करत असल्याचे नवी मुंबईकरांनाही माहिती आहे. परंतु याबाबत राज्य सरकारने तसेच महापालिका प्रशासनाने आजतागायत काहीही कार्यवाही केलेली नसल्याचे मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाच्या व राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.
सारसोळे स्मशानभूमीत यापूर्वी नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातील, ठाणे,पनवेल, उरण, मुंबईनिवासी कोरोनाने मृत झालेले मृतदेह अंत्यविधीसाठी सुरूवातीला मोठ्या प्रमाणावर आले होते. सारसोळे स्मशानभूमीत कोरोनावर अंत्यविधी झाल्यावर सॅनिटायझेशन कालही होत नव्हते. आजही होत नाही. सारसोळे स्मशानभूमीत नेरूळबाहेरील कोरोना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावेत यासाठी अनेक माजी नगरसेवक स्मशानभूमी कर्मचाऱ्यांवर चुकीच्या पध्दतीने दबाव आणून राजकारण करू लागले आहेत. नेरूळ पूर्वेला अनेक मोठमोठे प्रकल्प आले, पण महापालिका प्रशासनाला त्या ठिकाणी स्मशानभूमी देता आली नाही व तेथील नगरसेवकांनीही पाठपुरावा केला नसल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
कोरोना मृतदेहांवर त्यांच्या स्थानिक भागातील स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करावेत याबाबत लेखी नियमावली असून राज्य सरकार व न्यायालयीन पातळीवरही तसे निर्देश उपलब्ध आहेत. अनेक नगरसेवक त्यांच्या प्रभागात स्मशानभूमीची सुविधा देवू शकले नाहीत तेच नेरूळ बाहेरील मृतदेह सारसोळे स्मशानभूमीत अंत्यविधी व्हावे यासाठी सातत्याने दबाव आणत आहेत, राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनवित आहेत. आज सारसोळे स्मशानभूमीत नेरूळ बाहेरील कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी व्हावेत यासाठी राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनवित प्रशासनावर दबाव आणत आहेत, त्या नगरसेवकांनी या स्मशानभूमीत सुविधा मिळाव्यात, समस्या सुटाव्यात यासाठी आजतागायत काहीही केलेले नाही. त्यांच्या वार्डातील मृतदेहांवर या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होत असताना व कोणताही विरोध झालेला नसताना केवळ नेरूळ बाहेरील मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नेरूळ पूर्वेचे माजी नगरसेवक व माजी नगरसेविका नाहक प्रतिष्ठेचा विषय बनवू लागले असल्याने आपणास राज्याचे मुख्यमंत्री व महापालिकेचे आयुक्त म्हणून आपल्या निदर्शनास ही बाब आणून देत आहोत. आम्ही सारसोळेचे ग्रामस्थ सारसोळेच्या स्मशानभूमीत नेरूळच्या मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास कधीही विरोध करत नाही व यापूर्वीही केला नाही. परंतु कोणी राजकीय घटक नेरूळ बाहेरील कोरोना मृतदेहांवर सारसोळे स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास दबाव आणत असेल तर आम्ही त्या ठिकाणी नेरूळबाहेरील कोणाही कोरोना मृतदेहावर त्या ठिकाणी अंत्यविधी होवू देणार नाही. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास नेरूळबाहेरील कोरोना मृतदेहांवर अंत्यविधीसाठी राजकीय प्रतिष्ठेचा विषय करून दबाव आणणाऱ्या माजी नगरसेवकांचीच राहील हेही आपणास यानिमित्ताने निदर्शनास आणून देत आहोत. कोरोना मृतदेहांसाठी स्वतंत्र स्मशानभूमीची मागणी मी सातत्याने महापालिकेकडे व राज्य सरकारकडे करत आहे. आपण नेरूळ पूर्वेला स्मशानभूमी निर्माण करण्यासाठी महापालिका प्रशासनाला निर्देश द्यावेत की जेणेकरून सारसोळे स्मशानभूमीत गर्दी होणार नाही आणि त्या भागातील माजी नगरसेवक आणि नगरसेविकांवर राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनविण्याची वेळ येणार नाही. त्या माजी नगरसेवक व नगरसेविकांनी आपल्या आमदारांच्या माध्यमातून कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी बनविण्यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव आणावा. सारसोळे स्मशानभूमीत केवळ नेरूळमधील मृतदेहांवर अंत्यविधी होतील. बाहेरील भागातील कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यविधी करण्यास आमचा कालही विरोध होता व यापुढेही राहील. आमची भूमिका प्रामाणिक आहे. आपण याबाबत सहकार्य करण्यास महापालिका प्रशासनाला व नवी मुंबई पोलिसांना निर्देश देण्याची मागणी मनोज मेहेर यांनी राज्य सरकार व नवी मुंबई महापालिका प्रशासनाला केली आहे.