संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२०००९६५७३
नवी मुंबई : कोव्हिड रूग्णाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या रूग्णालय व्यवस्थापणास व संबंधित मनपा अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई कार्यक्षेत्रातील घणसोली येथे क्रेडेन्स हॉस्पिटल या रूग्णालयाला प्रत्यक्ष पाहणी न करता महापालिका प्रशासनाकडून नोंदणी दिल्याने सुविधा नसलेल्या रुग्णालयाला कोव्हिड रुग्णालयाचे परवानगी मिळाली व त्यामुळे या रुग्णालयात कोव्हिडचे रुग्ण दाखल झाले, परंतु रुग्णालयात आयपीएचएसच्या नॉर्मनुसार सोयी सुविधा नसल्याने आपण रुग्णालयाची परवानगी रद्द केली. दरम्यान रुग्णालयात दाखल असलेले रुग्ण इतरत्र भरती न करता घरी सोडल्याने एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. उपरोक्त मृत्यूला आपल्या वातानुकूलित चेंबरमध्ये बसून प्रत्यक्ष पाहणी न करता नोंदणी देणारे वैद्यकीय आरोग्य अधिकारी हे जबाबदार आहेत.यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तरच याप्रकरणी मृतात्म्यास न्याय दिल्यासारखे होईल. कोव्हिडकाळात आपण प्रत्यक्ष काम करत असताना काही अधिकारी केवळ खुर्च्या उबवण्याचे राजकारण करत आहेत. आपण स्वत: आयुक्त असताना नवी मुंबईकरांनी केलेल्या एका एसएमएस अथवा व्हॉटस अप मेसेजवर आपण काम करत आहात. सर्वसामान्यांचे आलेले आपल्या भ्रमणध्वनीवरील कॉल उचलून त्यांची कामे करून कोरोना महामारीच्या काळात दिलासा देण्याचे प्रशंसनीय काम करत आहात. तथापि गंभीर घटना घडल्यावरही पालिका प्रशासनाचे आरोग्य अधिकारी भ्रमणध्वनी उचलत नाही. लोकांना उत्तरे न देताना बेजबाबदार दाखवित आहेत. घडलेल्या घटनेचे गांभीर्य समजत नसणाऱ्या व कोव्हिड रूग्णांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या या अधिकाऱ्यांवर तसेच रूग्णालय व्यवस्थापनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून या अधिकाऱ्यांना व गलथान कारभार करणाऱ्या रूग्णालयाला या निमित्ताने जागा दाखविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी केली आहे.