संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : महापालिका प्रशासनाने लस
पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून थेट लस खरेदी करून
ती नवी मुंबईकरांना तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे
प्रवक्ते रवींद्र सावंत यांनी लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे
केली आहे.
सध्या कोरोनाचे दुसरी लाट आलेली असून यामुळे नवी मुंबईत
कोरोनाचे रूग्ण वाढले आहेत. तसेच पूर्वीच्या तुलनेत आता कोरोनाने मृत झालेल्यांचीही
संख्या वाढलेली आहे. लवकरच कोरोनाची तिसरी लाटही येणार आहे. मागील दोन लाटांच्या तुलनेत
उंबरठ्यावर असलेली तिसरी लाट ही महाविनाशकारी असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात
येत आहे. त्यामुळे येवू पाहणाऱ्या या तिसऱ्या लाटेत आणि सध्या सुरू असलेल्या दुसऱ्या
लाटेत कोरोनामुळे नवी मुंबईकरांची हानी टळावी यासाठी महापालिका प्रशासनाने आता तातडीने
पावले उचलणे आवश्यक असल्याचे रवींद्र सावंत यांनी निवेदनात म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशामध्ये नवी मुंबई
महापालिकेची श्रीमंत महापालिकेमध्ये गणना होत आहे. स्वमालकीचे धरण आणि अडीच हजार कोटीच्या
ठेवी तसेच गेली अनेक वर्षे मालमत्ता करात व पाणी पट्टीत वाढ न करणारी महापालिका यामुळे
महापालिका तिजोरी सक्षम असल्याचे सर्वाना माहिती आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनापासून
नवी मुंबईकरांचा बचाव करणे पालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. सध्या महापालिकेला केंद्र
सरकार व राज्य सरकारकडे लसीसाठी अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे कोठेतरी नवी मुंबईकरांना
लस घेण्यासाठी आधार घेण्याची वेळ आलेली आहे. लस उपलब्ध आहे, संपली आहे, येणार आहे,
या ठिकाणी लस उपलब्ध आहे असे दररोज सांगण्याची वेळ महापालिका
प्रशासनावर आलेली आहे. ही लाजिरवाणी बाब असल्याचे सांगत रवींद्र सावंत यांनी नाराजी
व्यक्त केली आहे.
सध्या महापालिका प्रशासनापुढे केवळ पावसाळीपूर्व कामे
ही अत्यावश्यक बाब असतानाही महापालिका प्रशासनाकडून वंडर्स पार्क (अंदाजे २५ कोटी),
सायन्स पार्क (अंदाजे १५० कोटी) यासह अन्य विकासकामेही महापालिका प्रशासनाकडून करण्यात
येणार आहेत असे प्रसिद्ध झालेल्या निविदांमधुन सिद्ध होत आहे. यावर अंदाजे ६०० ते ७००
कोटी सध्या विकासकामांवर खर्च होणार असल्याचे समजत आहे. सद्य:
स्थितीत केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून केवळ कोविड बाबतीत अत्यावश्यक असलेली
कामेच करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. या.सर्वोच्य न्यायालयाने देखील असेच मत नोंदवले
आहे. कोरोनाविरोधातील लढा आजच्या काळात महत्वाचा असून सदरची विकासकामे कोविड संपल्यानंतर
झाली तरी चालतील. सध्या कोरोनाचे निर्मूलन हेच महापालिका प्रशासनाचे सर्वोच्च ध्येय
असले पाहिजे. पावसाळी पूर्व कामे वगळता अन्य कामे महत्वाची नसल्याने सदर कामांना स्थगिती
देऊन त नवी मुंबईकरांना लस उपलब्ध होण्यासाठी महापालिका प्रशासनाने थेट लस उत्पादन
करणाऱ्या कंपन्यांकडून लस खरेदी करून ती नवी मुंबईकरांना उपलब्ध करून द्यावी. यासाठी
नवी मुंबई महापालिका प्रशासनाचा फारसा निधी खर्च होणार नाही आणि ज्या करदात्या, नवी
मुंबईकरांच्या बळावर महापालिका प्रशासनाची तिजोरी आज सधन बनलेली आहे, त्याच नवी मुंबईकरांच्या
आरोग्यासाठी, कोरोनाविरोधात संरक्षण करण्यासाठी लस खरेदीसाठी तिजोरीतील काही निधी खर्च
झाला तरी हरकत नाही. महापालिका प्रशासनाने लस उपलब्ध करून घेण्यासाठी नवी मुंबईकरांना
होत असलेला त्रास कमी होण्यासाठी लागणारा द्राविडी प्राणायम लक्षात घेता लस उत्पादक
कंपन्यांकडून थेट लस खरेदी करावी आणि कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी या लसीचा सर्वसामान्य
नवी मुंबईकरांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून फायदा व्हावा यासाठी महापालिका प्रशासनाने
तातडीने हालचाली कराव्यात. समस्येचे गांभीर्य आणि आमच्या म्हणण्यामागील कळकळ लक्षात
घेता आपण संबंधितांना लस खरेदीसाठी तातडीने निर्देश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी
केली आहे.