युवा सेनेचे पदाधिकारी सस्मित भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी
नवी मुंबई : कोरोनामुळे व्यवसाय बुडालेल्या रिक्षा चालकांचे कर्जाचे हफ्ते आगामी ६ महिने न घेण्याबाबत बॅका, पतसंस्था, वित्तीय संस्थांना आदेश देण्याची मागणी युवा सेनेचे नेरूळमधील उपविभाग अधिकारी सस्मित भोईर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.कोरोनामुळे सर्वाचेच अर्थकारण कोलमडून पडले आहे. रिक्षा व्यवसाय पूर्णपणे थंडावला आहे. रेल्वेमध्ये प्रवासास बंदी असल्याने रेल्वे स्टेशनवर सहा –सहा तास उभे राहूनही एक-दोन ग्राहकही भेटत नाही. रिक्षा चालकांना-मालकांना घर चालविणेही अवघड झाले आहे. नातलग, मित्र परिवार यांच्याकडून पैसे उसने घेवून घर चालवावे लागत आहे. त्यातच रिक्षा घेण्यासाठी त्यांनी घेतलेले कर्ज आता त्यांना अवघड जागेचे दुखणे बनले आहे. व्यवसाय होत नाही. महिन्याला तीन-चार हजाराचाही व्यवसाय होत नाही. घर चालविता येत नाही. त्यांना रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते त्यांना गेल्या दोन-तीन महिन्यापासून भरता आलेले नाही. जगण्यासाठी पुरेसा पैसा मिळत नाही. उपासमार होत आहे. या पार्श्वभूमी रिक्षा त्यांना उभ्या करून ठेवाव्या लागल्या आहेत. रिक्षा विकत घेण्यासाठी कर्जाचे हफ्ते फेडणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे रिक्षा चालकांची ही गैरसोय लक्षात घेवून आपण रिक्षा व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सवलत देण्यासाठी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत. कोरोनामुळे हतबल झालेल्या रिक्षा चालकांना दिलासा देण्यासाठी आपण बॅका, पतसंस्था, वित्तिय संस्था यांना रिक्षा चालकांना रिक्षा घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी सहा महिन्याची आता मुदत मिळणे आवश्यक आहे. आपण बॅका, पतसंस्था, वित्तिय संस्था यांना रिक्षा चालकांना रिक्षा घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी ६ महिन्याची मुदत देण्यात यावी. या सहा महिन्यात कर्जाचे हफ्ते घेण्यात येवू नये असे सरकारच्या वतीने संबंधितांना निर्देश देण्याची मागणी युवा सेनेच्या सस्मित भोईर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.