नवी मुंबई : नवी मुंबईमधील नेरूळ सेक्टर २-४ मधील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमधील समस्या सोडविण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाही याच समस्या निवारणासाठी संदीप खांडगेपाटील यांनी स्वतंत्रपणे निवेदन दिले आहे.
नेरूळ सेक्टर २-४ परिसरात सारसोळे शांतीधाम ही महापालिकेची स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीमध्ये नेरूळ पूर्व-पश्चिम, जुईनगर परिसरातून मृतदेह अंत्यविधीसाठी येत असतात. लोकसंख्या वाढत असतानाही नेरूळ पूर्वेला एकही स्मशानभूमी बांधली न गेल्याने येथील स्मशानभूमीवऱ् कमालीचा ताण येत आहे. नेरूळ पूर्वेकडील लोकांना अर्धा ते पाऊण तास पायपीट करत येथे अंत्यविधीसाठी यावे लागत आहे. सर्वच बाजूने मृतदेह या ठिकाणी अंत्यविधीसाठी येत असल्याने त्या त्या भागात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नव्याने स्मशानभूमी बांधणे आवश्यक असल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीमध्ये कोरोनाग्रस्त मृतदेहांवर तसेच बिगर कोरोनाग्रस्त मृतदेहांवर एकत्रच अंत्यविधी करण्यात येत आहे. या ठिकाणी कोरोनाग्रस्त मृतदेहांवर अंत्यविधी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात ग्लोव्हज तसेच अंगावर पीपीई किट पहावयास मिळत नाही. लाकडे रचताना, मृतदेहाला अंत्यविधी करताना स्मशानभूमी कर्मचाऱ्यांचा थेट कोरोनाशी संबंध येतो. त्यामुळे स्मशानभूमी कर्मचारी व पर्यायाने त्यांच्या परिवाराला कोरोनाचा धोका कायम आहे. नंतर कोऱोनाग्रस्तांवर अंत्यविधी झाल्यावर बिगर कोरोनाग्रस्त मृतदेहावर हेच कर्मचारी अंत्यविधीचे कार्य करतात. या कर्मचाऱ्यांचा बिगर कोरोनाग्रस्त मृतदेह घेवून येणाऱ्यांशी थेट संबंध येत असतो. शहरामध्ये कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणारी महापालिका स्मशानभूमी कोरोना प्रसाराचे काम करत असताना तिकडे मात्र कानाडोळा करत आहे. स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना पीपीई किट व ग्लोव्हज दिल्यास त्याच्या जिवितावर असलेले कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी कमी होईल. या स्मशानभूमीत मयत घेवून येणाऱ्यांना साधे हाताला करण्यासाठी कोठेही पालिका प्रशासनाने सॅनिटाईस उपलब्ध करून दिलेले नसल्याचे संदीप खांडगेपाटील यांनी पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीवर अंत्यविधीसाठी अवलंबून असलेले कार्यक्षेत्र पाहता येथील स्मशानभूमी कर्मचाऱ्यांना दररोज वापरण्यासाठी पीपीई किट व ग्लोव्हज उपलब्ध करून दिले पाहिजे. मृतदेह घेवून येणाऱ्यांना हाताला सॅनिटाईज करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देणे, तसेच कोरोनाग्रस्तावर अंत्यविधी झाल्यावर प्रत्येक वेळी स्मशानभूमीत सॅनिटायझेशन होणे आवश्यक आहे. सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीतील समस्या सोडविण्यासाठी व तेथे सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेतील संबंधितांना तात्काळ निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.