Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ -९८२००९६५७३
नवी मुंबई : ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तिंना महापालिका प्रशासनाकडून घरी जावून कोरोना लस उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या नवी मुंबई शहरात कोरोनाने घातलेला उपद्रव आयुक्त तसेच प्रशासक या नात्याने जवळून पाहिला आहे. कोरोना लसीच्या उपलब्धतेबाबत सुरू असलेला सावळागोंधळही आता लपून राहीलेला नाही. आजही नवी मुंबई मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक व अपंग व्यक्तिंना अद्यापि कोरोनाची पहिली लसही उपलब्ध झालेली नाही. त्यातच लसीचा असलेला गोंधळ पाहता शहरातील ज्येष्ठ नागरिकांना व अपंग व्यक्तिंना कोरोनावरील लस कधी उपलब्ध होईल तेही निश्चित सांगता येत नाही. ज्येष्ठ नागरिक ही खऱ्या अर्थाने आपल्या शहराची संपत्ती आहे. त्यांना जपणे व त्यांच्या अनुभवाचा फायदा घेणे हे कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने शहरातील ज्येष्ठ नागरिकांना व अपंग व्यक्तिंना घरोघरी जावून कोरोना लस टोचावी व त्यांच्या जिविताचे रक्षण करण्याची मागणी सौ. रूपाली किस्मत भगत यांनी निवेदनात केली आहे.