समाजसेवक मनोज मेहेर यांचा महापालिका आयुक्तांकडे पाठपुरावा
Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ -९८२००९६५७३
नवी मुंबई : नेरूळ पूर्वेला मागील काही वर्षात शहरीकरण वाढल्याने लोकसंख्येतही कमालीची वाढ झालेली आहे. तेथील मृतदेहांवर आजही नेरूळ पश्चिमेकडील सेक्टर २-४ येथील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणले जात आहे. त्यासाठी २० ते २५ मिनिटाची पायपीट व मृतांच्या नातलगांना होणारा त्रास आणि नेरूळ पश्चिमचीही लोकसंख्या वाढल्याने मृतदेहानांही आता अंत्यविधीसाठी वेटींगची वेळ आल्याने वाढती लोकसंख्या पाहता नेरूळ पूर्वेला स्मशानभूमी बांधण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ पूर्व आणि नेरूळ पश्चिम, जुईनगर भागातील मृतदेह अंत्यविधीसाठी नेरूळ सेक्टर २-४ येथील सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीत पूर्वीपासून येत आहेत. आता या भागातील लोकसंख्या वाढल्याने, परंतु महापालिका प्रशासनाकडून नव्याने स्मशानभूमीची निर्मिती न केल्याने सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीवर ताण वाढू लागला आहे. त्यातच माजी नगरसेवक आपल्या राजकीय ताकदीचा व प्रतिष्ठेचा वापर करून नेरूळबाहेरील मृतदेह या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी आणू लागल्याने मृतदेहांना अंत्यविधीसाठी वेटींग करावी लागत आहे. नेरूळ पूर्वेकडील मृतदेहांवर अंत्यविधीसाठी त्याच ठिकाणी पालिका प्रशासनाने स्मशानभूमी बनविल्यास सारसोळे शांतीधाम स्मशानभूमीवर ताण वाढणार नाही. समस्येचे गांभीर्य ओळखून तातडीने नेरूळ पूर्व भागात स्मशानभूमी बनविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या संबंधितांना निर्देश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.