कोरोना रूग्णावरील उपचाराबाबतची इंत्यभूत माहिती रूग्णांच्या नातेवाईकांना वेबपोर्टलच्या माध्यमातून ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्या : सुनिता हांडेपाटील
नवी मुंबई : महापालिकेच्या आरोग्य विभागात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णावरील उपचाराबाबतची इंत्यभूत माहिती पालिका प्रशासनाकडून रूग्णांच्या नातेवाईकांना ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासन करत असलेले प्रयत्न खरोखरीच प्रशंसनीय आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रूग्णांची संख्या आता आटोक्यात आलेली आहे. कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेसाठी पालिका प्रशासनाकडून जय्यत तयारीही करण्यात आलेली आहे. महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागात कोरोनाग्रस्त उपचारासाठी दाखल झाल्यावर ते त्यास डिसचार्ज भेटेपर्यत त्या रूग्णास काय काय उपचार त्या कालावधीत सुरू आहेत, याची इंत्यभूत माहिती पालिका प्रशासनाकडून संबंधित रूग्णांच्या नातेवाईकांना प्राप्त करून देणे आवश्यक आहे. कोरोना रूग्णावर उपचार सुरू असताना त्याचे करण्यात आलेले सिटी स्कॅन असेल, रक्त तपासणी केली असेल, रूग्णाची ऑक्सिजन पातळी काय आहे, रूग्णास कोणकोणता त्रास जाणवत आहे याची त्या कालावधीत इंत्यभूत माहिती उपचार घेणाऱ्या रूग्णांच्या नातेवाईकांना पालिका प्रशासनाने दररोज ‘अपडेट’ स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. यासाठी केंद्र व राज्य पातळीवर सातत्याने विविध पुरस्कार मिळविणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने कोरोना रूग्णावरील उपचाराबाबत एक स्वतंत्र वेबपोर्टल निर्माण करून त्यावर कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या रूग्णांबाबतची दररोजची माहिती अपडेट करावी व या याबाबतची लिंक व पासवर्ड रूग्णांच्या नातेवाईकांना उपलब्ध करून देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
उपचार घेणाऱ्या रूग्णाच्या ऑक्सिजन पातळीविषयी, सिटी स्कॅनविषयी, रक्त तपासणी, रूग्णाच्या दररोजच्या प्रकृतीबाबत नातेवाईकांना दररोज त्या कालावधीत अपडेट स्वरूपात माहिती उपलब्ध करून दिल्यास रूग्णाच्या नातलगांना दिलासा मिळेल. ते उपचार पध्दतीबाबत काही शंका असल्यास ते या अहवालाच्या आधारावर अन्य रुग्णालयात अथवा परिचित तसेच फॅमिली डॉक्टरांकडे माहिती उपलब्ध करून घेतील. त्यांना रूग्ण उपचार घेत असलेल्या कालावधीत रूग्णाच्या प्रकृतीबाबतची माहिती मिळाल्यास रूग्णांच्या घरचेही निर्धास्त राहतील. आमच्या म्हणण्यामागील कळकळ जाणून घेवून व कोरोनाग्रस्त रूग्णांच्या उपचाराबाबतच्या पारदर्शक कार्यप्रणालीमुळे नवी मुंबईकरांचा प्रशासनाच्या आरोग्य विभागावरील विश्वासही वाढीस लागेल. आपण लवकरात लवकर कोरोना रूग्णांच्या उपचाराबाबत रूग्णांच्या नातलगांना दररोज ‘अपडेट’ स्वरूपात माहिती उपलब्ध व्हावी यासाठी तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.