नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 2 व 4 मधील पथदिव्यांची समस्या दूर करण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या अवकाळी पाऊस पडत असून अवघ्या दहा दिवसांनी खऱ्या अर्थाने सुरू होईल. सांयकाळी 6 नंतर ढगाळ वातावरणामुळे लवकरच सर्वत्र अंधार पडत आहे. त्यातच नेरूळ सेक्टर 2 व 4 मध्ये नादुरूस्त पथदिव्यांमुळे स्थानिक रहीवाशांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. नेरूळ सेक्टर 2 मधील एलआयजी परिसरात तसेच सविनय, वारणा, आम्रपाली,जयहिंद या गृहनिर्माण सोसायट्या तसेच नेरूळ सेक्टर 4चा परिसर या ठिकाणी पथदिवे मोठ्या प्रमाणावर बंद पडले आहेत. त्यातच जे पथदिवे चालू आहेत, त्यातून केवळ नाममात्र रोषणाई येत आहे. त्यामुळे हे पथदिवे केवळ नावालाच चालू असल्याचा संताप स्थानिक रहिवाशांकडून व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी या समस्येचे निवारण होणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणचे पथदिवे नादुरूस्त आहेत, त्याची दुरूस्ती तात्काळ होवून स्थानिक परिसरातील अंधाराची समस्या दूर करावी तसेच अंधुक प्रकाश देणाऱ्या पथदिव्यांची दुरूस्ती करून नवीन बल्ब बसवावेत अथवा त्याच पथदिव्यांवर छोटेखानी हायमस्ट उभारल्यास जनतेला दिलासा मिळून त्यांचीही उजेडाबाबतची गैरसोय दूर होईल. समस्येचे गांभीर्य ओळखून तातडीने समस्येचे निवारण करण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.