नवी मुंबई : नवी मुंबईतील स्मशानभूमी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवून व सुविधा देण्यासाठी पालिका प्रशासनाने युध्द पातळीवर प्रयत्न करण्याची मागणी समाजसेवक गणेश भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वत्र हाहाकार उडविला असून आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा सर्वाचेच परिश्रम प्रशंसनीय असून या सर्वानी या काळात केलेले काम कोणालाही विसरता येणार नाही. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका प्रशासनात काम करणाऱ्या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचे कामही अतुलनीय आहे. या दुर्लक्षित घटकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी दुर्दैवाने कोणताही राजकीय घटक अथवा सामाजिक घटकांने पुढाकार घेवू नये ही खरोखरीच शोकांतिका आहे. स्मशानभूमीत कोरोनाग्रस्त व बिगर कोरोनाने मृत झालेल्या सर्वावर एकाच स्मशानभूमीत एकत्रितच अंत्यविधी केले जातात. या स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना अंत्यविधीच्या वेळी आम्ही कधीही पीपीई किट घातलेले पाहिलेले नाही. पीपीई किट तर सोडा साधे हातातले ग्लोव्हजही या कर्मचाऱ्यांकडे नसतात. त्यामुळे ते आपला व आपल्या कुटूंबाचा जीव धोक्यात घालून स्मशानभूमीत येणाऱ्या मृतदेहांवर अंत्यविधी करत असतात. कोरोनाग्रस्त रूग्णांवर अंत्यविधी झाल्यावर पालिका प्रशासनाकडून कधीही स्मशानभूमीचे सॅनिटायझेशन केले जात नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या जिवितावर धोक्याची टांगती तलवार कायम आहे. स्मशानभूमीत कधीही जा. कोठेही सॅनिटायझेशनची व्यवस्था पहावयास मिळत नाही. याशिवाय हे स्मशानभूमी कर्मचारी कंत्राटी कामगार असल्याने ते काम करता करता कोरोना महामारीत मृत झाले तर त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटूंबाचे काय? हा साधा विचारही कोणी करत नाही. कोरोना महामारीशी लढा देणाऱ्या या स्मशानभूमी कर्मचाऱ्यांचा परिवार देशोधडीला लागण्याची भीती आहे. कायम कामगार मृत पावल्यास ७५ लाखापर्यत (सर्व एकत्रित रक्कम जमा धरता) मदत मिळते, मग कोरोना मृतदेहांवर अंत्यविधी करणाऱ्या स्मशानभूमी कर्मचाऱ्यांनाही ही मदत मिळालीच पाहिजे. नवी मुंबई ही श्रीमंत महापालिका आहे. अडीच हजार कोटीच्या एफडी आहेत. एफडी मिरविण्यात आम्हा नवी मुंबईकरांना स्वारस्य नाही. वेळ पडल्यास एफडी मोडा, पण स्मशानभूमीतील कर्मचारी काम करताना कोरोना काळात मृत झाल्यास त्याच्याही परिवाराला महापालिका प्रशासनाने ७५ लाखाची मदत करायला हात आखडता घेवू नये. महापालिकेच्या अन्य कर्मचाऱ्यांना चहा, नाष्टा व अन्य सुविधा उपलब्ध होतात. मात्र स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना कामावर आल्यावर जळणारे मृतदेह, लाकडाचे ढिगारे, दफनभूमी याशिवाय अन्य काही दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या मनसिकतेचाही प्रशासनाकडून विचार होणे आवश्यक आहे. पालिका प्रशासनाने स्मशानभूमी कर्मचाऱ्यांचे वेतनही अन्य कामगारांच्या तुलनेत तातडीने वाढविले पाहिजे. हे कामगार दिवसरात्र मृत्यूशी संघर्ष करत नवी मुंबईकरांना अंत्यविधीच्या सोपस्कारासाठी मदत करतात. आजच्या काळात स्मशानभूमीतील सर्वच कर्मचाऱ्यांच्या पालिका प्रशासनाने कोरोना योध्दा म्हणून जाहिर सत्कार केला पाहिजे. स्मशानभूमी कामगारांच्या सर्व समस्यांचे तात्काळ निवारण करून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला तातडीने निर्देश देण्याची मागणी गणेश भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.ण्याच