नवी मुंबई : गृहनिर्माण सोसायट्यांच्या अंर्तगत भागातील धोकादायक झाडे व ठिसूळ झालेल्या फांद्या तोडण्यासाठी आलेल्या निवेदनांवर लवकर निर्णय देण्याची मागणी माजी नगरसेवक व शिवसेना विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पावसाळीपूर्व कामाचा एक भाग म्हणून पालिका प्रशासनाकडून बाहेरील धोकादायक वृक्षांची व ठिसूळ झालेल्या फांद्यांची छाटणी करण्यात येत असते. तथापि प्रशासन गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातील वृक्षांची छाटणी करत नाही. नवी मुंबई शहरातील गृहनिर्माण सोसायट्या या २५ ते ४० वर्षे जुनाट आहेत. या सोसायटीच्या आवारातील झाडेही जुनी झाल्याने ती धोकादायक व झाडाच्या फांद्याही ठिसूळ झालेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोसायटी आवारातील धोकादायक झाडे व ठिसूळ झालेल्या फांद्या तोडण्यासाठी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांकडून महापालिका प्रशासनाला लेखी निवेदन सादर करण्यात येत असते. महापालिका प्रशासनाकडून लवकर निर्णय दिला जात नसल्याने सोसायटीतील रहीवाशांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. सोसायटी आवारातील धोकादायक झाडांमुळे व ठिसूळ फांद्यामुळे पडझड झाल्यास सोसायटी आवारातील उभ्या असलेल्या वाहनांची तसेच सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगत उभ्या राहणाऱ्या वाहनांची हानी होते. सोसायटी आवारातील रहीवाशांना तसेच पदपथावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना गंभीर दुखापतीही झालेल्या आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धोकादायक वृक्षामुळे सोसायटीच्या छतावरील पत्रे तसेच बाजूच्या सोसायटीच्या छतावरील पत्र्यांची हानी होते. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने धोकादायक वृक्षांच्या तसेच ठिसूळ फांद्याच्या छाटणीबाबत अथवा तोडण्याबाबत परवानगीपत्र मागितल्यास आपण तात्काळ काही तासातच त्यांना परवानगी द्यावी. पावसाळा आता अवघ्या काही दिवसावर आलेला आहे. त्यामुळे गृहनिर्माण सोसायटींकडून धोकादायक वृक्ष अथवा ठिसूळ फांद्या तोडण्यासाठी परवानगीपत्र आल्यास अवघ्या काही तासातच तोडण्यासाठी परवानगी देण्याची मागणी रतन नामदेव मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.