नवी मुंबई : सारसोळे गावातील कै. बुध्या बाळ्या वैती मार्गाच्या सुरूवातीलाच महापालिकेने बांधलेल्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात साचलेले पाणी तात्काळ काढण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य व सारसोळे गावातील कोलवाणी माता मित्र मंडळाचे अध्यक्ष मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये असलेल्या गावांची ओळख जपण्यासाठी, गावांचे अस्तित्व ठळकपणे उठून दिसण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून गावामध्ये प्रवेश करतानाच प्रवेशद्वार (वेस/कमान) बांधण्याचे निश्चित केले असून अनेक गावांमध्ये प्रवेशद्वार बांधण्याचे कामही अंतिम टप्प्यात आलेले आहे. सारसोळे गावातही कै. बुध्या बाळ्या मार्गावर महापालिका प्रशासनाने प्रवेशद्वार (वेस/कमान) बांधले असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कोरोनामुळे काम मंदावले आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पाऊसामुळे प्रवेशद्वाराच्या वरच्या भागातील चौकोनामध्ये प्रचंड पाणी साचले होते. अजूनही पाणी बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून प्रवेशद्वारालगतच्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहीवाशांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. डासांमुळे मलेरिया व अन्य साथीच्या आजारांचा उद्रेक होवू नये यासाठी संबंधितांना तातडीने प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात साचलेले पाणी काढून टाकण्याचे आदेश देण्याची मागणी मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.