नवी मुंबई : कोपरखैराणेमधील सेक्टर १६ मधील एलआयजीतील माथाडी वर्गाच्या वीजेबाबतच्या समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता कोपरखैराणे विभाग यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईतून नवी मुंबईत स्थंलातरीत झाल्यावर या ठिकाणी काम करणाऱ्या माथाडी या श्रमिक वर्गाची निवासी सोय उपलब्ध व्हावी म्हणून कोपरखैराणे, घणसोली, ऐरोली, नेरूळ व अन्यत्र सिडकोने माथाडी वर्गासाठी निवासी सुविधा उपलब्ध केली. कोपरखैराणे सेक्टर १६ मधील एलआयजीमधील माथाडी वसाहत हा त्यातीलच एक भाग आहे. माथाडी वसाहतींना अनेक वर्षाचा कालावधी लोटला आहे. येथे विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत केबल्सही जुनाट व जिर्ण झाल्या आहेत. त्यामुळे येथील माथाडी वर्ग व अन्य रहीवाशांना सतत वीज जाण्याच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे येथील वीज जाण्याच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी निवेदनात केली आहे.
याच सेक्टर १६ परिसरात अनेक ठिकाणी सदनिकांना वॉल बॉक्सही लावलेले नाहीत. काही ठिकाणी वॉल बॉक्स असले तरी अनेक ठिकाणी अजूनही वॉल बॉक्स नाहीत. वीजेचा लपंडाव, वॉल बॉक्स नसणे,केबल्स जुन्या व जिर्ण असणे यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी दुर्घटनाही होण्याची भीती आहे. आपण तातडीने जुनाट व जिर्ण झालेल्या केबल्स बदलणे, वॉल बॉक्स बसविणे, वीजेच्या लंपडावावर कायमस्वरूपी तोडगा काढणे या समस्या निवारणासाठी संबंधितांना निर्देश द्यावेत. पावसाळा आता अवघ्या काही तासावर आलेला असल्याने लवकरात लवकर या समस्यांचे निवारण करून स्थानिक रहीवाशांना सहकार्य करण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महावितरणकडे केली आहे.