नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८२ व ८४ मधील गृहनिर्माण सोसायटींमध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहरामध्ये अजूनही मोठ्या प्रमाणावर ४५ च्या वर्षावरील वयोगटाला कोरोना महामारी प्रतिबंधात्मक लसचा पहिला डोसही मिळालेला नाही. नागरी आरोग्य केंद्रात व महापालिका रूग्णालयात हेलपाटे मारून रहीवाशी त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने प्रभाग ८२ व ८४ मध्ये कोरोना लसही गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात विशेष अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्यास रहीवाशांना सोसायटी आवारातच लस उपलब्ध होईल. ज्येष्ठ नागरिकांना दगदगही करावी लागणार नाही. तसेच महापालिका प्रशासनाला या अभियानातून एकाच ठिकाणी अनेकांना लस उपलब्ध करून देणेही शक्य होईल. सध्या पावसाळा सुरू होण्यास काही तासाचाच कालावधी राहीलेला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर प्रभाग ८२ व ८४ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात विशेष अभियानाच्या माध्यमातून लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.