नवी मुंबई : पेट्रो व डिझेल इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेस पक्षाकडून नवी मुंबईतील नेरूळमध्ये ब्लॉक अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली अभिनव आंदोलन करण्यात आले. पेट्रोलपंपावर इंधन भरण्यात आलेल्या वाहनचालकांकडूनच दरवाढीविषयी बनविलेला केक कापून त्यांना गुलाबाची फुले भेट म्हणून देण्यात आली.या अभिनव आंदोलनाची चर्चा नवी मुंबईत बराच वेळ चर्चा सुरू होती.
नेरूळ सेक्टर सहा येथे पामबीच मार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावर गुरूवारी दुपारी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या वतीने इंधन व गॅसच्या वाढत्या दरवाढीबाबत ब्लॉक अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कॉंग्रेसचे ओबीसी नवी मुंबई सेलचे प्रमुख संतोष सुतार, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, नेरूळ ब्लॉक उपाध्यक्ष दिनेश गवळी, सुधीर पांचाळ, गौरव महापुरे, स्वप्निल सोरटे, गजानन कापडणे, रूषी व इतर कार्यकर्ते आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.
पेट्रोल पंपावर आलेल्या दुचाकी व चार चाकी वाहनचालकांसमवेत इंधन दरवाढीच्या निषेधार्थ रवींद्र सावंत व इतर सहभागींनी जोरदार घोषणाबाजी केली. पेट्रोल दरवाढ शंभरी गाठल्याने, डिझेल व गॅसचे दर भडकत असल्याने इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनचालकांना ते इंधनाचे दर वाढत असतानाही मौन बाळगत असल्याने त्यांचा फुले देवून कॉंग्रेसकडून सत्कार करण्यात आला. याशिवाय हेच का अच्छे दिन, इंधन दरवाढीला शुभेच्छा याशिवाय दरवाढीबाबत घोषणाबाजी देत वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. इंधन भरण्यासाठी आलेल्या दुचाकीवरील माणसांसोबत असलेल्या लहान मुलाच्या हातून यावेळी केक कापण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात पंपावर इंधन भरण्यासाठी आलेले वाहनचालकही घोषणा देत आपला संताप व्यक्त करताना दिसले.