कचरा संकलनासाठी दिवसातून दोन वेळा गाडी पाठविण्याची मागणी
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 6 व सारसोळे गावातील तुटलेल्या कचराकुंड्या हटवून त्याजागी नवीन कचराकुंड्या बसविण्यासाठी व कचरा घेवून जाण्यासाठी पूर्वीप्रमाणेच दिवसातून दोन वेळा वाहने पाठविण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर 6 व सारसोळे गावात आजही रस्त्यावर कचराकुंड्या आहेत. आजमितीला या कचराकुंड्या जुनाट झाल्या असून तुटल्याही आहेत. या कचराकुंड्यातून कचरा बाहेर पडत असून त्यातून कचऱ्याचे पाणीही रस्त्यावर वाहत असते. येथून ये-जा करणाऱ्या रहीवाशांना व वाहनचालकांना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय या कचराकुंड्या जुनाट झाल्या असून तुटलेल्याही आहेत. त्यामुळे सदर ठिकाणच्या कचराकुंड्या हटवून त्या ठिकाणी नवीन कचराकुंड्या बसविण्यात याव्यात. पावसाळा आता अवघ्या काही तासावर आलेला असल्याने तुटलेल्या कचराकुंड्यातून बाहेर पडणारा कचरा, कचऱ्याचे वाहणारे दुर्गंधीचे पाणी यामुळे स्थानिकांना साथीचे आजारही होण्याची भीती आहे. त्यामुळे संबंधित तुटलेल्या कचराकुंड्या लवकरात लवकर बदली करण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.
पूर्वी नेरूळ सेक्टर सहा व सारसोळे गावात कचरा घेवून जाण्यासाठी कचरा वाहतुकीची वाहने दोन वेळा यायची. त्यामुळे कोठेही कचरा साठलेला पहावयास मिळत नसे. गेल्या काही महिन्यापासून एकच वेळ कचरा वाहतुकीची वाहने येत आहेत. त्यामुळे एकदा कचरा घेवून गेल्यावर दुसऱ्या दिवशी वाहने कचरा घेवून जाण्यासाठी येतात. यादरम्यान कचरा साठून स्थानिक रहीवाशांना, ग्रामस्थांना कचऱ्याच्या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. समस्येचे गांभीर्य ओळखून तुटलेल्या कचराकुंड्या हटवून नवीन कचराकुंड्या बसविण्याचे आणि दिवसातून दोन वेळा कचरा घेवून जाण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी केली आहे.