नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरातील
१८ वर्षावरील प्रत्येकाला लसीकरण महत्वाचे आहे. लस देणे गरजेचे असून अनावश्यक विकासकामे
महत्वाची नाहीत. त्यामुळे नवी मुंबई शहरात नेरूळमध्ये महापालिका प्रशासनाच्या वतीने
सुरू असलेले
सायन्स पार्क व म्युझियमचे काम तातडीने थांबविण्याचे
महापालिकेला आदेश देण्याची मागणी महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत
मेहेर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली
आहे.
नवी मुंबई शहरात कोरोना महामारीचा उद्रेक दोन्ही लाटेमध्ये
झालेला महाराष्ट्रानेच नाही तर देशाने जवळून पाहिलेले आहे. तिसरी लाट सुरू झालेली आहे.
नवी मुंबईकरांना सध्या कोट्यवधी रूपये खर्च होत असलेल्या विकासकामांची नाही तर नवी
मुंबईतील १८ वर्षे वयोगटावरील प्रत्येकालाच लसीकरणाची गरज आहे. नवी मुंबईत आजही अनेक
लसीकरणापासून वंचित आहे. टॉवरमध्ये श्रीमंत नवी मुंबईकर खासगी रूग्णालयांशी संपर्क
साधून सोसायटी आवारात लसीकरण करवून घेत आहेत. सर्वसामान्य गोरगरीब नवी मुंबईकरांना
पैसे देवून लस विकत घेणे त्यांना शक्य नाही. पावसाळी पूर्व कामांचा अपवाद वगळता नवी
मुंबई शहरात करोडो रूपये खर्चून विकासकामांची काहीही गरज नाही. श्रीमंत महापालिकेने
सर्वप्रथम तळागाळातील गोरगरीब नवी मुंबईकरांना कोरोना महामारीपासून वाचविण्यासाठी आपला
निधी खर्च करणे काळाची गरज आहे. कोरोना झाल्यावर महापालिकेने उपचार न करता कोरोना या
शहरात कोणालाच होवू नये यासाठी शहरातील १८ वर्षे वरील वयोगटातील प्रत्येकालाच लस मिळणे
आवश्यक आहे. एकीकडे श्रीमंत नवी मुंबईकर पैशाच्या जोरावर खासगी रूग्णालयाकडून सोसायटी
आवारात लसीकरण करून घेत असताना तळागाळातील सर्वसामान्य नवी मुंबईकरांना सर्वप्रथम लस
उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.
पावसाळीपूर्व कामे होणे गरजेचे आहे. त्याबाबत कोणाचेही
काहीही म्हणणे नाही. परंतु एकीकडे तळागाळातील सर्वसामान्य नवी मुंबईकर लस मिळविण्यासाठी
संघर्ष करत असताना महापालिका प्रशासन करोडो रूपये खर्चाच्या सायन्स पार्क व म्युझियमचे
कामाचा घाट का रचत आहे? कोरोना महामारीत १८ वर्षे वयोगटावरील प्रत्येकाला प्रथम महापालिकेने
लस उपलब्ध करून द्यावी, त्यानंतरच विकासकामांना सुरूवात करावी. नवी मुंबई शहरातील प्रत्येकालाच
आज महापालिका प्रशासनाकडून लस हवी आहे. ती लस उपलब्ध करून देण्याएवजी सायन्स पार्क
व म्युझियमला महापालिका प्रशासन करोडो रूपये का खर्च करत आहे? अशा प्रकल्पांना सुरूवात
झाल्यास आम्हाला नाईलाजाने न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील, शहरातील शेवटच्या नागरीकाला
लस भेटल्याशिवाय कोणत्याही विकासकामांना सुरूवात होता कामा नये. शहरातील १८ वर्षेवरील
प्रत्येकाला लस मिळाल्याशिवाय अन्य कोणत्याही विकासकामांना मंजुरी
देवू नये व मंजुरी मिळालेल्या प्रकल्पांना स्थगिती द्यावी, याबाबत तातडीने नवी मुंबई
महापालिका प्रशासनाला आदेश देण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी मुख्यमंत्र्यांकडे
केली आहे.