Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६, ९८२००९६५७३
नवी मुंबई : महापालिका प्रशासनात काम करत असलेल्या मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांचा कोरोना आल्यापासून प्रलंबित असलेला कोरोना विशेष भत्ता व एक वर्षाहून अधिक काळ न देण्यात आलेल्या वेतन वाढीतील फरकाची रक्कम या कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्याची मागणी समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केलेली आहे.
गेल्या दिड वर्षापासून आपण सर्वच कोरोना महामारीचा सामना करत आहोत. कोरोनामुळे सर्व घरात बसलेले असताना व व्यवहार ठप्प झालेले असतानाही महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी वर्ग नवी मुंबईकरांना नागरी सुविधा देण्याचे व नागरी समस्या सोडविण्याचे करत असलेले काम प्रशंसनीय आहे. आपली व आपली घरच्यांच्या जिविताची पर्वा न करता कोरोना महामारीत प्रशासनातील कायम, ठोक तसेच कंत्राटी कर्मचारी व अधिकारी इमानेइतबारे सेवा करत आहे. या सर्वामध्ये प्रशासनाकडून मुषक नियत्रंण कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत आहोत. मुषक नियत्रंण कर्मचारी अहोरात्र मुषक नियत्रंणाचे काम करत असले तरी कोरोना महामारीच्या काळात त्यांना मंजुर असलेल्या कोरोना भत्यातील एक रूपायाही त्यांना आजतागायत देण्यात आलेला नाही. तसेच वेतन वाढीतील फरक त्यांना एक वर्षाहून अधिक काळ लोटला तरी या कर्मचाऱ्यांना भेटलेला नाही. या कर्मचाऱ्यांना सुरूवातीपासून प्रलंबित असलेला कोव्हिड विशेष भत्ता व वेतनवाढीतील फरक तात्काळ देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.