Navimumbailive.com@gmail.com – ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
बीड: ज्या पध्दतीने कोल्ड ब्लडेड खून करणाऱ्यांची
पुर्व तयारी व पुर्ण तयारी दिसत नाही. आरोपीचा भोळाभाबडा चेहरा समोर असला तरी दिसत
नाही. तशाच प्रकारे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता शिवसेना यांनी मराठा समाजाच्या
हिताचा कोल्ड ब्लडेड खून केला, असा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार
यांनी आज येथे केला.
मराठा आरक्षणाबाबत राज्यात निर्माण झालेल्या स्थिती बाबत चर्चा व मराठा समाजाच्या विविध
संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्यासाठी भाजपाचे नेते महाराष्ट्र दौरा करीत
असून यातील चार दिवसाचा बीड, परळी, नांदेड असा दौरा भाजपा नेते आमदार अँड आशिष
शेलार करीत आहेत.
आज त्यांनी दुपारी मराठा समाजाच्या विविध संघटनांंच्या प्रतिनिधींंशी बीड येथे
बैठक घेऊन संवाद साधला. यावेळी भाजपा आमदार अँड लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा, सुरेश
धस,जिल्हा अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आदींसह पदाधिकारी उपस्थितीत होते.
त्यानंतर आमदार अँड आशिष शेलार यांनी भाजपा कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन
पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी त्यांनी सांगितले की, जेव्हा कालेलकर आयोग आला ज्यामध्ये मराठा समाजाचा
हिताचा विचार झाला पण तो अहवाल तत्कालीन सरकारने टेबलच केला नाही. मंडल आयोगाच्या वेळी एक संधी घेता आली असती ती घेतलीच नाही. बापट आयोगाने
मराठा समाजाला आरक्षण नाकारले पण तो अहवाल ही सरकारने नाकारला नाही. वेगवेगळ्या
आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारणाऱ्या शिफारशी केल्या त्या शिफारशी तत्कालीन
काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारने नाकारल्या नाहीत. त्यानंतर राणे समिती आली. खरंतर
आयोगाची गरज होती पण समिती नेमली. अशा प्रकारे एक एक करत मराठा समाजाच्या हिताचा
खून करण्याचे काम तत्कालीन आणि आजच्या सरकार मधील पक्षांनी केले. आज हीच लोकं
भाजपाला शिकवण्याचे काम करीत आहेत. आम्हाला शिकवू नका . नाकाने कांदे सोलू नका.
मराठा समाजाच्या हिताची भूमिका घ्या, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारला ठणकावले.
गायकवाड आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवून अहवाल दिला. तो अहवाल संपूर्ण पणे
सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारने मांडला नाही. अन्यथा समाजाला मिळालेले फायदे
टीकले असते.
म्हणून मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण हवे आहे त्यासाठी मराठा समाजाच्या आक्रोशाला
भाजप पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून साथ देत आहे. त्यासोबतच ठाकरे सरकारने मराठा
समाजाला ३ हजार कोटींचे पँकेज द्यावे, ओबीसींच्या सवलती मराठा समाजाला लागू
कराव्यात, तसेच अन्य कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला नख लावू नका अशा मागण्या
त्यांनी यावेळी केल्या. ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाजाला आरक्षण ठाकरे सरकारने दिले. त्यात तुमचे
कर्तृत्व काय? आजपर्यंत मराठा मोर्चाची खिल्ली उडवणाऱ्या शिवसेनेची, छत्रपतींच्या
वंशजाकडे पुरावे मागण्याची भावनाशून्यता दिसलीच होती आता कर्तृत्व शून्यतापण
दिसली.
ओबीसींंच्या राजकीय आरक्षणाबाबत ही पंधरा महिने काहीच न केल्याने ठाकरे सरकारने
ओबीसी समाजाचे ही मोठे नुकसान केले. समाजासमाजात तेढ आणि भांडणे लावण्याचे काम
इंग्रजांप्रमाणे ठाकरे सरकार करते आहे, असा आरोप ही त्यांनी केला.