संदीप खांडगेपाटील : 8369924646 – 9820096573
नवी मुंबई : केंद्र व राज्य सरकारदरबारी सतत पारितोषिकांचा वर्षाव स्विकारणारी नवी मुंबई महापालिका स्वत:चे संकेतस्थळ वेळोवेळी ‘अपडेट’ करण्यास उदासिनता दाखवित असल्याचे पुन्हा एकवार उघडकीस आले आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर महापालिका विभाग अधिकाऱ्यांच्या माहितीवर नजर टाकली असता नेरूळ व ऐरोली या विभाग अधिकाऱ्यांचा मेलआयडी टाकण्यात आलेला नाही. कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबईकर घरातूनच आपल्या समस्या पालिका प्रशासनाला मेलवरच कळवून सोडवित असल्याने या दोन विभाग अधिकाऱ्यांचा संपर्कासाठी मेलआयडी तात्काळ संकेतस्थळावर टाकण्याची मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.
महापालिका निर्मितीनंतर प्रशासकीय कारभार हाताळण्यासाठी प्रशासनाकडून नवी मुंबई शहराचे बेलापुर, नेरूळ, वाशी, तुर्भे, कोपरखैराणे, घणसोली, ऐरोली, दिघा अशा आठ विभागामध्ये विभाजन केले. त्या त्या विभाग कार्यालयाच्या माध्यमातून तेथील नागरी समस्या निवारणाचे व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. सध्या कोरोना महामारीच्या काळात नवी मुंबईकर आपल्या समस्या थेट पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना मेलवरच पाठवून सोडवित आहेत.
पालिका संकेतस्थळावर भेट दिली असता, विभाग अधिकाऱ्यांच्या माहिती असलेल्या पृष्ठावर सर्व विभाग अधिकाऱ्यांचे नाव, विभाग कार्यालयातील दुरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी व मेल आयडी प्रकाशित करण्यात आलेला आहे. तथापि नेरूळचे पालिका विभाग अधिकारी भरत धांडे व ऐरोलीच्या विभाग अधिकारी मिताली संचेती या दोन विभाग अधिकाऱ्यांचे मेल आयडीबाबत कोणतीही माहिती टाकण्यात आलेली नाही. ऐरोली व नेरूळ विभागात पावसाळ्यामध्ये काही समस्या घडल्यास पालिका प्रशासनाला कळविण्यासाठी त्यांचे मेलआयडी संकेतस्थळावर तात्काळ टाकण्याची व जनतेची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याबाबत महापालिकेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी खातरजमा करून दुरूस्ती करून घेतो, असे सांगितले.