संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सध्या दोन नावावरून वादंग सुरू आहे. काही घटक आंदोलनाच्या आडून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा सोशल मिडियावर मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना हे उद्योग कधीही खपवून घेणार नाही. त्यामुळे समाजातील शांतता भंग पावून परिस्थिती चिघळण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी परिस्थिती चिघळविणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई शिवसेनेकडून आज नेरूळ पोलिस ठाण्यात जावून लेखी निवेदनातून करण्यात आली आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा ठराव नुकताच सिडकोच्या संचालक मंडळाने संमत केला आहे. त्यानंतर स्थानिक घटकांकडून या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी असलेले लोकनेते दिबा पाटील यांचे नाव पुढे केले. यानिमित्ताने मानवी साखळीचे आयोजनही करण्यात आले होते. लोकशाहीत प्रत्येकाला आपली बाजू मांडण्यासाठी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्याला कोणाचाही विरोध नाही. मात्र यानिमित्ताने काही घटक जाणिवपूर्वक सोशल मिडियावर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी सोशल मिडियावर अवमानकारक शब्दांचा वापर करत आहेत. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना संतप्त आहेत. सध्या नामकरणावरून निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नवी मुंबई शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या शिष्टमंडळात शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, अतुल कुलकर्णी, शहरप्रमुख विजय माने, विभागप्रमुख अरूण गुरव, नगरसेवक काशिनाथ पवार यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.