संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नेरूळच्या पंचरत्न सोसायटीतील रहीवाशांनी घातले पालिका प्रशासनाला साकडे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ मधील सिडकोच्या पंचरत्न सोसायटीत घडलेली दुर्घटना आजही नवी मुंबईकरांच्या स्मरणात आहे. ही इमारत महापालिका प्रशासनाने धोकादायक घोषित केलेली आहे. या इमारतीच्या पुर्नबांधणीच्या परवानगीचे काम महापालिका प्रशासन दरबारी अंतिम टप्प्यात आहे. महापालिका प्रशासनाने येथील रहीवाशांच्या निवासी सुविधेसाठी निवारा शेडही उपलब्ध करून दिलेले नाही. रहीवाशांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने अन्य ठिकाणी भाड्याने ते सध्या राहूही शकत नाही. या पार्श्वभूमीवर पंचरत्न सोसायटीतील रहीवाशांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तथा महापालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांची भेट घेत आम्ही सध्या आमच्याच इमारतीत राहणार असून काही घडल्यास त्याची जबाबदारीही आमचीच राहणार असल्याची ग्वाही लेखी निवेदनातून दिली.
पंचरत्न इमारत अतिधोकादायक वर्गात मोडत असून येथील रहीवाशांची अन्यत्र भाड्याने राहण्याची आर्थिक ताकदही नाही. रहीवाशी कोरोनामुळे हतबल झाले आहेत. दुसरीकडे केवळ धोकादायक इमारतीची नोटीस देणाऱ्या महापालिकेने त्यांच्यासाठी निवारा शेडही उपलब्ध करून देण्याची तत्परता आजतागायत दाखविलेली नाही. सध्या पावसाळा सुरू झाला असून आम्ही आमच्या सदनिकेत राहण्यास तयार असून काही घडल्यास त्याची जबाबदारीही आमचीच राहील अशी लेखी निवेदनातून ग्वाही पंचरत्नच्या रहीवाशांनी महापालिका प्रशासनाला दिली आहे. सोसायटीचे सहसचिव अनिल सावंत, सोसायटी पदाधिकारी गजानन तांडेल आणि अशोक सोमरे व रहीवाशी गणेश भगत यांचा शिष्टमंडळात समावेश होता.