संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९९६५७३
नवी मुंबई : महापालिका कार्यक्षेत्रातील अपंग, दिव्यांगांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरोघरी जावून कोव्हिड १९ची लस देण्याची मागणी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाकडून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर नागरी आरोग्य केंद्रे, माता बाल रूग्णालय व अन्य ठिकाणी कोरोना लस ४५ वर्षे वयावरील नवी मुंबईकरांना
लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. तथापि नवी मुंबईतील दिव्यांग, अपंग व ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस मिळविण्यासाठी आजही विविध अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. अपंग, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी प्रशासनाने आता कोठे तरी सकारात्मक पाऊल उचलणे आवश्यक आहे. अपंग, दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नसल्याने आजही त्यांना कोरोनावरील लस प्राप्त झालेली नाही. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जावून दिव्यांग, अपंग तसेच ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस द्यावी की जेणेकरून नवी मुंबई कोरोनामुक्त करण्याचे आपले अभियान शंभर टक्के यशस्वी होण्यास मदत होईल. दिव्यागांना, अपंगांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना घरोघरी जावून कोरोना लस देण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी रवींद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.