संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९९६५७३
नवी मुंबई : नेरूळ नोडमधील महापालिका प्रभाग ८७ च्या नेरूळ सेक्टर ८ व १० मध्ये पदपथावर तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात ब्लिचिंग पावडर फवारण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक व विभागप्रमुख रतन नामदेव मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या १०-१२ दिवसापासून नवी मुंबईत संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पदपथ व सिडकोच्या गृहनिर्माण सोसायटीतील आवारही निसरडे होण्यास सुरूवात झालेली आहे. या प्रभागात ९५ टक्के सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. कंडोनिअमअंर्तगत आपण जलवाहिन्या व मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्यात आल्या आहेत. पदपथावर व सोसायटीच्या आवारात शेवाळही काही भागात दिसू लागले आहे. पदपथ व सोसायटी आवारातील परिसर निसरडे होवू लागल्याने पदपथावरून ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, लहान मुले पडण्याची शक्यता आहे. त्यातून जखमा अथवा गंभीर दुखापती होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग ८७ मधील नेरूळ सेक्टर ८ व १० मधील पदपथावर व गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातही ब्लिचिंग पावडर टाकण्याचे संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.