नवी मुंबई : प्रभाग ८५, ८६ मधील नेरूळ सेक्टर ६, सारसोळे गाव व कुकशेत गावातील पदपथावर तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेरूळ तालुकाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
गेल्या १०-१२ दिवसापासून नवी मुंबईत संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पदपथ व सिडकोच्या गृहनिर्माण तसेच खासगी सोसायटीतील व गावातील इमारतींचे आवारही निसरडे होण्यास सुरूवात झालेली आहे. नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. कंडोनिअमअंर्तगत आपण जलवाहिन्या व मल:निस्सारण वाहिन्या बदली करण्यात आल्या आहेत. पदपथावर व सोसायटीच्या आवारात शेवाळही काही भागात दिसू लागले आहे. पदपथ व सोसायटी आवारातील परिसर निसरडे होवू लागल्याने पदपथावरून ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक, लहान मुले पडण्याची शक्यता आहे. त्यातून जखमा अथवा गंभीर दुखापती होण्याची भीती आहे. सारसोळे व कुकशेत गावातील पदपथावरही तातडीने ब्लिचिंग पावडर टाकणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग ८५, ८६ मधील नेरूळ सेक्टर ६ व सारसोळे गाव आणि कुकशेत गावातील पदपथावर व गृहनिर्माण सोसायटीच्या आवारातही ब्लिचिंग पावडर टाकण्याचे संबंधितांना तातडीने निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.