संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३
नवी मुंबई : महापालिकेत संमत झालेल्या विकास आराखड्याबाबतची प्रशासकीय स्तरावरील माहिती मिळण्याची मागणी शिवसेनेच्या प्रभाग ८७ च्या माजी नगरसेविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी महापालिका आायुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबई शहराच्या विकास आराखड्याबाबत महापालिका सभागृहात संमत झाला. या विकास आराखड्यात संपूर्ण शहरातील विकासाबाबतचे, सुविधांबाबतचे तसेच भुखंड आरक्षणाबाबतचे सविस्तर चित्र स्पष्ट झाले होते. हा विकास आराखडा मंत्रालयीन स्तरावर मंजुरीसाठीही महापालिका प्रशासनाकडून पाठविण्यात आला होता. महापालिका सभागृहात विकास आराखडा मंजुर होण्याच्या घटनेला आता बराच कालावधी लोटला आहे. त्या विकास आराखड्याचे प्रशासकीय पातळीवर काय झाले? मंजुरी मिळाली अथवा नाही? अथवा मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे का मंत्रालयीन पातळीवरून काही सुचना करण्यात आलेल्या आहेत. प्रभाग ८७ मध्येही विकासकामांसाठीही अनेक सिडकोकडे असलेल्या आरक्षित भुखंड सुविधांसाठी हस्तांतरीत होणे अजून बाकी आहे. पाठपुरावा सिडको व महापालिका स्तरावर गेल्या अनेक वर्षापासून आम्ही करत आहोत. त्यामुळे विकास आराखड्याबाबत प्रशासकीय पातळीवर असलेली सद्य: स्थिती आम्हाला पालिका प्रशासनाकडून लेखी स्वरूपात देण्याची मागणी सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.