संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना आपल्या मतदारसंघात कोरोनावर मात करण्यासाठी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे या नेहमी अग्रेसर राहिल्या आहेत. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली असली तरी नवी मुंबईतील नागरिकांना रुग्णवाहिकांची कमतरता भासू नये, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी आमदार निधीतून २ सुसज्ज अशा सर्व सुविधांयुक्त रुग्णवाहिका नवी मुंबई महानगरपालिकेला दिल्या आहेत. सदर रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा नवी मुंबई महापालिका आयुक्त श्री. अभिजित बांगर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर रुग्णवाहिका या कार्डियाक रुग्णवाहिका असून त्यात ऑक्सिजन सुविधा, बेसिक इंजेक्शन, स्ट्रेचर, प्राथमिक उपचार, फायर सिस्टम, इमर्जन्सी रिस्पॉन्स फ्लॅशिंग लाईट अशा आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत. यापूर्वीही ५ रुग्णवाहिका नवी मुंबई महापालिका आरोग्य सेवेकरिता त्यांच्या आमदार निधीतून देण्यात आल्या आहेत. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे, डॉ. राजेश पाटील, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, नगरसेवक डॉ.जयाजी नाथ, अशोक गुरखे, दीपक पवार, शिल्पा कांबळी, दत्ता घंगाळे, भरत जाधव, जयश्री चित्रे, डॉ.दीपक बैद, राजेश राय, राजू तिकोणे, सुहासिनी नायडू, प्रियांका म्हात्रे, चैताली ठाकूर, दर्शन भारद्वाज, रणजीत नाईक, जयेश थोरवे, महेश मढवी, रुपेश मढवी, ऑड्रे मॉरीस, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, डॉ. संजय काकडे, उपायुक्त योगेश कुडूस्कर, आरोग्य अधिकारी डॉ. सोनावणे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईतील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये याकरिता सदर रुग्णवाहिका या ज्येष्ठ नागरिक,महिला वर्ग यांच्या लसीकरणाकरिता फिरते दवाखाने म्हणून वापरात येणार असल्याचे आमदार सौ.मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी भाजप आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले कि, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची वाढती संख्या नियंत्रणात आली असली तरी रुग्णवाहिका तसेच व्हेंटीलेटरची अजूनही कमतरता भासत आहे. तसेच खाजगी रुग्णवाहिकांचे चालकांकडून अवाढव्य रक्कम सांगून लुटालुटीचे प्रकार सुरु आहेत. खाजगी रुग्णवाहिकांच्या मालकांची मुजोरी पाहता तसेच रुग्णवाहिकांची वाढती मागणी लक्षात घेता माझ्या आमदार निधीतून सर्व सुविधांयुक्त अशा ५ रुग्णवाहिका यापूर्वी वैद्यकीय सेवेकरिता उपलब्ध करून दिल्या आहेत. परंतु सद्यस्थितीत मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे, याकरिता या 2 रुग्णवाहिका सेवेत रुजू होणार आहेत. जेथे सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत किंवा ज्या नागरिकांना लस घेण्यासाठी जाण्यास असमर्थ आहेत, फेरीवाले-रिक्षावाले-टॅक्सीचालक यांचेही लसीकरण व्हावे अशा ठिकाणी या रुग्णवाहिकांचा वापर करण्यात येणार आहे. अजुन ३ डोळ्यांच्या उपचारासह इतर उपचार करण्याकरिता अजून 3 रुग्णवाहिका आमदार निधीतून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तांसहित सर्व अधिकारी वर्ग तसेच आपआपल्या प्रभागातील नगरसेवक यांनी कोव्हीड काळात चांगले काम केले आहे. या सर्वांच्या प्रयत्नामुळेच नवी मुंबई महापालिकेची आरोग्य सेवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अधिक सक्षम असून येथील रुग्णसंख्या नियंत्रणात आलेली आहे. माझ्या मतदारसंघातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देणे तसेच त्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी हे माझे प्रथम कर्तव्य असून लवकरच आमदार निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार असल्याने आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचीही आवश्यकता असल्याचे आमदार सौ. मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
यावेळी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले कि, महापालिकेच्या कठीण काळात आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची नेहमी मदत मिळाली आहे. त्यांनी यापूर्वी देण्यात आलेल्या ५ रुग्णवाहिका उत्तम आरोग्य सेवा बजावत आहेत. त्यांनी दिलेले व्हेंटीलेटर्स कोव्हीड काळात उपयोगात आल्याने अनेक रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेता त्यांनी ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी त्वरित १ कोटी रूपयांचा निधी मंजूरही करून घेतला. त्यांच्या नेहमी होणाऱ्या सहकार्यामुळे महापालिकेलाही आरोग्य सेवा बजावताना कोणतीही कसर कमी पडत नसल्याचे त्यांनी सांगितले.