संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर ६ मधील सिडको वसाहतीमधील एव्हरग्रीन व वरूणा सोसायटीच्या समोरील रस्त्यावर साचून राहणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची तसेच वरूणा सोसायटीलगत असणाऱ्या मैदानाकडील पदपथावर असलेले मातीचे ढिगारे तात्काळ हटविण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ तालुका अध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
महापालिका प्रभाग ८५ मधील नेरूळ सेक्टर सहामध्ये सिडको वसाहतीमध्ये एव्हरग्रीन सोसायटी व वरूणा सोसायटीच्या समोरील रस्त्यावर काही भाग समांतर नसल्याने त्या ठिकाणी पाणी साचून राहते. पाण्याचा निचरा होत नाही. पावसाळा सुरू झाल्यापासून तेथील रहीवाशांना डासांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी साचून राहत असल्याने नागरिकांना त्याच ठिकाणाहून ये-जा करावी लागत आहे. रहीवाशांना साथीच्या आजाराचा सामना करावा लागण्याची भीती आहे. आपण पाणी साचत असल्याने रस्त्याची डागडूजी करून पाणी साचणार नाही याबाबत आपण संबंधितांना निर्देश देवून युध्दपातळीवर काम करण्याची मागणी महादेव पवार यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
नेरूळ सेक्टर ६ मधील वरूणा सोसायटीच्या संरक्षक भिंतीलगतच मैदानाच्या बाजूने असलेल्या पदपथावर मोठ्या प्रमाणावर मातीचे ढिगारे लांबवर पडलेले आहेत. त्या पदपथावरून दोन माणसांनाही ये-जा करता येत नाही. त्यातच पाऊस सुरू असल्याने मातीचा चिखल झाला आहे. लोकांना त्या ठिकाणाहून ये-जा करताना चिखलाचा व दुर्गधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणचे मातीचे ढिगारे हटविल्यास स्थानिकांना तेथून ये-जा करण्यास त्रास होणार नाही. स्थानिकांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी संबंधितांना ते मातीचे ढिगारे हटविण्याचे आदेश देण्याची मागणी महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.