पनवेल : पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत असला तरीदेखील येथील निसर्गाचे सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालत आहे. पावसाळ्याच्या दिवसात येथील मनमोहक सौंदर्य पर्यटकांना त्या ठिकाणी जाण्यास प्रवृत्त करतो. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गाढी नदी, गाढेश्वर धरण, मोरबे धरण, कुंडी धबधबा, वारदोली धबधबा या परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या जीवावर बेतत आहे. या परिसरात जाताना पर्यटक स्वतःचा मृत्यू ओढवून घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जून महिना सुरू झाला असून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुले सगळीकड़े हिरवीगार झाडे उगवली आहेत. निसर्गाचे मनमोहक सौंदर्य पर्यटकाना आकर्षित करत आहे. पावसाळा सुरू झाला की, पर्यटकांना ओढ लागते ती पावसाळी सहलींची. वीकॆण्ड अथवा एकदिवसीय सहलींसाठी पनवेल तालुक्यातील गाढेश्वर धरण उत्तम पर्याय आहे. पनवेलपासून १६ कि.मी. अंतरावर असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे हे धरण आहे. निसर्गाचे सानिध्य, हिरवाई, चारही बाजूने डोंगराच्या रांगा, त्यामध्ये धरणातून धबधब्यासारखे पडणारे पाणी यामुळे पर्यटक धरणाकडे अधिक आकर्षक होतात. शनिवार आणि रविवारी या धरणावर मोठ्या प्रमाणात पर्यटक पाण्यात मौज मजा करण्यासाठी येत असतात. मात्र या वर्षी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना धरणात उतरता येणार नाही असे तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी सांगितले.
त्यातच शनिवार आणि रविवार सुट्टीचा वार म्हटला की, हजारोंच्या संख्येने पर्यटक या धरणाकडे मौजमजा करण्यासाठी येतात. या ठिकाणी मद्य प्राशन करून पाण्यात पोहोण्यासाठी जातात. मात्र येथील पाण्याचा अंदाज न आल्याने गेल्या काही वर्षापूर्वी अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. गेल्या १० वर्षात गाढेश्वर परिसरात गमावला जवलपास २० हुन अधिक जणांनी प्राण गमावला आहे. मात्र या वर्षी गाढेश्वर धरणावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यानी स्पष्ट केले आहे.