संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील गटारावरील लोखंडी झाकणे बदली करून त्या ठिकाणी सिमेंटची झाकणे बसविण्याची मागणी भाजपच्या प्रभाग ९६च्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी एका लेखी निवेदनातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि पालिका नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नेरूळ नोडमधील प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६, १६ए, १८ या परिसराचा समावेश होत आहे. मागील सहा वर्षाच्या कालावधीत प्रभागामधील पदपथावरील तसेच अंतर्गत भागातील गटारावरील असणारी लोखंडी झाकणे असंख्य वेळा चोरीला गेलेली आहेत. त्यामुळे गटारात माती पडणे, डेब्रिजचे ढिगारे पडणे, गटारे चोकअप होणे व नागरिकांना डासांचा पर्यायाने साथीच्या आजाराचा सामना करावा लागणे यासह विविध समस्यांचा सामना करावा लागलेला आहे. वारंवार गटारावरील झाकणे चोरीला जात असल्याने लोकनाराजीचा सामना आम्हाला विनाकारण सहन करावा लागला आहे. लोखंडी झाकणे भंगारात विकली जात असल्याने होत असलेल्या चोऱ्या थांबविणे मागील ६ वर्षात महापालिका प्रशासनालाही शक्य झालेले नाही. गटारावरील लोखंडाची झाकणांची चोरी होणे आणि आम्ही पालिका प्र्रशासनाकडे तक्रारी करून निदर्शनास आणून देणे हाच प्रकार मागील ६ वर्षात सुरू आहे. हा प्रकार कोठेतरी थांबला पाहिजे. गटारावरील लोखंडी झाकणे चोरीला जात असल्याने त्यावर पर्याय म्हणून आता गटारावर सिमेंटची झाकणे तातडीने बसविण्यात यावीत, ही झाकणे कधी चोरीला जाणार नाहीत. समस्येचे गांभीर्य जाणून प्रभाग ९६ मधील गटारावर लोखंडी झाकणे काढून त्यावर सिमेंटची झाकणे बसविण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.