संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : सानपाडा नोडमधील प्रभाग ७६ मध्ये कोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी व स्थानिक रहीवाशांना अधिकाधिक कोव्हिड १९ लसीकरणाचा लाभ घेता यावा यासाठी सोसायटीनिहाय पालिका प्र्रशासनाने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी सानपाडामधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
पांडुरंग आमले यांनी सोमवारी या विषयासाठी महापालिका मुख्यालयात जावून आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांचेसमवेत भाजपाचे नवी मुंबई जिल्हा महामंत्री विजय घाटे, भाजपाचे सानपाडा नोडचे पदाधिकारी रमेश शेटे हेही उपस्थित होते. या बैठकीत पांडुरंग आमले यांनी प्रभाग ७६ मध्ये लसीकरणाचे अभियान प्रभावीपणे राबवायचे असेल तर गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लसीकरण करण्याची गरज असल्याचे पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. आमले यांच्या मागणीवर पालिका आयुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लसीकरण अभियानाची अंमलबजावणी होताना पहावयास मिळेल असा आशावाद भाजपाचे जिल्हा महामंत्री विजय घाटे यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी लसीकरण अभियानाची मागणी करणारे स्थानिक विभागातील ५ गृहनिर्माण सोसायट्यांचे निवेदनही आमले यांनी आयुक्तांना सादर केले.