Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
फैजपूर येथे तीन काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून दौऱ्याची सुरुवात
काँग्रेस पक्षाकडून सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुधवार दि. २३ जूनपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जात आहेत. बुधवारी जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कृषी कायद्यांच्या प्रती जाळून या दौऱ्याची ते सुरुवात कऱणार असून धुळे, नंदुरबार आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्याला ते भेट देऊन काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आणि संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत.
काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन संपन्न झालेल्या जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे बुधवारी केंद्र सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कृषी कायद्याच्या प्रतींचे दहन करून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ते शेतकरी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. या दौऱ्यात नाना पटोले या भागातील कोविड सेंटर आणि कोविड रुग्णालयांना भेट देतील तसेच काँग्रेस पक्षातर्फे सुरु असलेल्या मदत कार्याचा आढावा घेणार आहेत तसेच ठिकठिकाणी ते काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांशीही संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत. प्रदेशाध्यक्षांच्या या दौऱ्यात त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, किसान काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम पांडे हेही असतील. पटोले यांचा चार दिवसांचा दौरा जळगाव जिल्ह्यापासून सुरु होऊन २६ जून रोजी नाशिक येथे त्याची सांगता होईल.