Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
मुंबई : कोरोना महामारीमुळे मोठे संकट उभे ठाकले असून अनेकांचे रोजगार हिरावले गेले आहेत. सर्वसामान्य लोकांबरोबरच नोकरी, व्यवसाय करणारे, मध्यम वर्गही कठीण आर्थिक संकटाला तोंड देत आहे. जगणेच कठीण झाले असताना शाळेची फी भरण्यासाठी शाळा प्रशासनाकडून पालकांवर दबाव टाकला जात आहे. कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या बहुसंख्य पालकांना शाळेची फी भरणे शक्य होत नाही. याचा विचार करून शालेय शुल्क ५० टक्के कमी करून उर्वरित फी टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत द्यावी, अशी मागणी माजी मंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान पुढे म्हणतात की, मागील दिड वर्षांपासून राज्यातील सर्व शाळा बंद असून शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन वर्ग सुरु आहेत तर दुसरीकडे विद्यार्थ्यांची पूर्ण फी भरण्याचा तगादा शाळा प्रशासन व संचालकांकडून लावला जात आहे. पालकांची आर्थिक स्थिती पाहता विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार नाही याचा विचार राज्य सरकारने करावा. ज्या शाळा जबरदस्तीने शालेय फी वसूल करतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि पालक व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, असे नसीम खान यांनी म्हटले आहे.