Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ मधील छत्रपती संभाजी राजे उद्यान रहीवाशांसाठी खुले करण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
प्रभाग ९६ मध्ये नेरूळ सेक्टर १६ मध्ये महापालिकेचे छत्रपती संभाजी राजे उद्यान आहे. या उद्यानाच्या सभोवताली चारही बाजूने सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. कोरोना महामारीचा उद्रेक वाढू लागल्यावर महापालिका प्रशासनाने हे उद्यान बंद केले. कोरोना काळात रहीवाशी, महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक घरातच आहेत. सध्या कोरोना महामारीचे प्रमाण महापालिका प्रशासनाने अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आलेले आहे. रहीवाशी मोकळी हवा घेण्यासाठी पामबीचच्या समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर चालण्यास जात आहे. महापालिका प्रशासनाने सकाळी ४ तास व सांयकाळी ४ तास हे उद्यान खुले केल्यास रहीवाशांना त्यांचा फायदा घेता येईल. घराच्या जवळच उद्यानात रपेट घेता येईल आणि वृक्षसंपदेच्या सहवासात रमता येईल. कोरोनाचे प्रमाण कमी होवूनही प्रशासनाने उद्यान खुले केले नसल्याने स्थानिक रहीवाशांमध्ये नाराजीचा सूर आळवला जावू लागला आहे. त्यामुळे कोरोना महामारीचे आटोक्यात येवू लागलेले प्रमाण आणि स्थानिक रहीवाशांकडून उद्यान सुरू करण्यासाठी करण्यात येणारी आग्रही मागणी या पार्श्वभूमीवर नेरूळ सेक्टर १६ मधील छत्रपती संभाजी राजे उद्यान रहीवाशांसाठी सकाळी व सांयकाळी खुले करण्याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली आहे.