Navimumbailive.com@gmail.com : ८३६९९२४६४६
नवी मुंबई : घंटा गाड्यातून तसेच कचरा वाहक वाहनातून येणाऱ्या दुर्गंधीतून प्रभाग ४२ मधील स्थानिक रहीवाशांची मुक्तता करण्यासाठी कचरा संकलन करणाऱ्या वाहनांची दुसरीकडे पार्किगची व्यवस्था करण्याची मागणी प्रभाग ४२ मधील भाजपच्या सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून मागणी केली आहे.
कोपरखैराणे सेक्टर १४ मध्ये डम्पिंग ग्राऊंडची कचरा वाहक वाहने, घंटा गाडी उभ्या असतात. गेल्या काही महिन्यापासून त्या ठिकाणी पीसीसीचे काम सुरू असल्याने ही वाहने सेक्टर २३ मध्ये उभी राहत असल्याने सेक्टर २२ व २३ मधील रहीवाशांना मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हे पीसीसीचे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास सेक्टर २२ व २३ मधील रहीवाशांची दुर्गंधीतून मुक्तता होईल. सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. प्रभागाच्या बाजूलाच खाडीकिनारा आहे. येथील रहीवाशांना बाराही महिने विविध साथीच्या आजाराचा सामना करावा लागत आहे. परिसरात सांयकाळनंतर घंटागाडी व कचरा वाहक वाहनातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक रहीवाशांना दारे, खिडक्याही उघडता येत नाही. कचरा वाहक वाहने उभी राहण्यास सुरूवात झाल्यानंतर या ठिकाणी डासांच्या प्रमाणात व दुर्गंधीत वाढ झाली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे. बाजूला असलेला खाडीकिनारा आणि कचऱ्यांच्या वाहनाचे वास्तव्य यामुळे साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची भीती रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे. काम कधी पूर्ण होणार आणि कचरा वाहक वाहनातून स्थानिक रहीवाशांची कधी मुक्तता होणार याबाबत संबंधित पालिका अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, सुरूवातीला दहा दिवस, त्यानंतर २५ दिवस, त्यानमतर दीड महिना आणि आता तर पाऊस कायम राहील्यास सांगता येणार नाही असे उत्तर देण्यात येत आहे. ही वाहने मोकळ्या भुखंडावर उभी करण्यात येत असून या भुखंडावर चिखल होवू लागल्याने तेथे डेब्रिज व रॅबिट टाकून वाहने त्यावर उभी करण्यात येत आहे. कचरा वाहक वाहनांच्या दुर्गंधीमुळे आणि डासांच्या वाढत्या उद्रेकामुळे स्थानिक रहीवाशी आता संताप व्यक्त करू लागले आहे. या संतापाचा कधीही उद्रेक होण्याची भीती आहे. जनतेचा उद्रेक होवून काही विचित्र घडण्यापूर्वी संबंधित पीसीसीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून कचरा वाहक वाहने येथून कायमस्वरूपी हटवावीत. पालिका आयुक्तांनी स्वत: येवून येथील रहीवाशांशी चर्चा केल्यास समस्येचे गांभीर्य समजून येईल. कचरा वाहक वाहनामुळे निर्माण झालेली दुर्गंधी आणि डासांचे वाढते प्रमाण यामुळे स्थानिक रहीवाशांच्या जिवाला धोका निर्माण झालेला आहे. कचऱ्याच्या वाढत्या दुर्गंधीमुळे आणि डासांच्या वाढत्या उद्रेकामुळे संतप्त रहीवाशांकडून काही घटना घडल्यास त्यास सर्वस्वी नवी मुंबई महापालिका प्रशासन जबाबदार राहील. जनतेमध्ये संतापाची भावना वाढीस लागली आहे. पीसीसीचे काम कधीही पूर्ण करा, पण पहिली येथून कचरा वाहक वाहने हटवून आम्हाला मृत्यूच्या विळख्यातून मुक्त करा असा संताप स्थानिक रहीवाशी उघडपणे व्यक्त करत आहे. संबंधितांना काम कधीही पूर्ण करा, पण सर्वप्रथम येथून वाहने हटविण्याचे आदेश द्यावेत. लवकरात लवकर या समस्येवर तोड्गा काढून स्थानिक रहीवाशांची या समस्येतून मुक्तता करण्याची मागणी समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
या समस्येबाबत समाजसेविका सुनिता देविदास हांडेपाटील यांनी १६ जून २०२१ रोजीही निवेदन देवून समस्येचे गांभीर्य त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.