संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : महापालिका प्रभाग ७६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात तसेच पदपथावर ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याची मागणी भाजपचे सानपाडामधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पाऊसामुळे प्रभाग ७६ मध्ये सानपाडा सेक्टर २,३, ४, ८ या परिसरातील रस्त्यालगतचे पदपथ निसरडे झाले असून काही ठिकाणी शेवाळही साचलेले दिसून येत आहे. पदपथावरून ये-जा करणारे ज्येष्ठ नागरिक. महिला, मुले पदपथावरून चालताना घसरून पडण्याच्या घटनाही घडू लागल्या आहेत. तोच प्रकार गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारातही घडू लागला आहे. कंडोनिअमअंर्तगत कामे करताना महापालिका प्रशासनाने सिडको सोसायटी आवारात जलवाहिन्या व मल:निस्सारण वाहिन्याही बदली करून दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर पदपथावरून चालताना तसेच गृहनिर्माण सोसायटीच्या आवारात चालताना घसरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी महापालिका प्रशासनाने प्रभाग ७६ मधील सानपाडा सेक्टर २,३,४,८ परिसरातील पदपथावर तसेच गृहनिर्माण सोसायट्यांच्या आवारात ब्लिचिंग पावडरची फवारणी करून रहीवाशांना दिलासा देण्याची मागणी भाजपचे सानपाडामधील युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.