संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : ऐरोलीतील सेंट झेविअर्स शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीच्या पालकांना कोरोना सुरू झाल्यापासून शाळेची फी भरता आलेली नाही. फी भरण्यासाठी शाळेने लावलेला तगादा आणि कोरोनामुळे काम नसल्याने फी भरण्यासाठी पालकांची हतबलता या पार्श्वभूमीवर एमआयएमच्या विद्यार्थी आघाडीने संबंधित मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली आहे.
कोपरखैराणे येथे तीन टाकी येथे राहणाऱ्या फातिमा अन्सारी यांची दोन मुले ऐरोलीतील सेंट झेविअर्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. कोरोना आल्यापासून फातिमा अन्सारी यांना काम नसल्याने त्यांना आपल्या दोन मुलांची शाळेची फी भरणे शक्य झाले नाही. फी भरण्यासाठी शाळेकडून सातत्याने तगादा लावण्यात येत असल्याने फातिमा अन्सारी यांनी नातेवाईकांकडून पैशाची उसनावारी करून दहावीत शिक्षण घेणाऱ्या आपल्या मुलाची फी भरली, तथापि त्यांना सातवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या सारा अली अन्सारी या आपल्या मुलीची फी भरणे शक्य झाले नाही. शाळेतून पुन्हा फीसाठी तगादा केला जावू लागल्याने फातिमा अन्सारी यांनी एमआयएमचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांच्याशी संपर्क साधत आपली कैफीयत मांडली.
मंगळवारी (दि. २९ जुन) सकाळी एमआयएमचे विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी ऐरोलीतील सेंट झेविअर्स शाळेमध्ये धाव घेत शालेय व्यवस्थापनाशी पालकांच्या उपस्थितीत चर्चा केली. पालकांना दोन्ही मुलांची फी भरणे शक्य नसल्याने हाजी शाहनवाझ खान यांनी संबंधित मुलीच्या शिक्षणाचा खर्च यापुढे एमआयएम विद्यार्थी आघाडी करणार असल्याचे तेथेच जाहिर केले. शालेय व्यवस्थापणाशी चर्चा करत अवास्तव आकारण्यात आलेली फी कमी करत उर्वरित फी भरण्याचे व येथून पुढे संबंधित मुलीच्या सर्व शिक्षणाचा खर्च एमआयएम विद्यार्थी आघाडी करणार असल्याचे हाजी शाहनवाझ खान यांनी सांगितले.
कोरोनामुळे सर्वच हतबल झाले असल्याने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ज्या पालकांना फी भरणे शक्यय नाही अशा मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन हाजी शाहनवाझ खान यांनी यावेळी केले.