संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई / पनवेल : म्हाप्रळ आंबेत पुलाला माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुले यांचे नाव देण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
रायगड-रत्नागिरीला जोडणाऱ्या म्हाप्रळ आंबेत पुलाची नुकतीच दुरुस्ती करण्यात आली असून या पुलाचा लोर्कापण सोहळाही झालेला आहे. माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर. अंतुलेसाहेब यांच्या पाठपुराव्यातून तसेच प्रयत्नातून हा पुल निर्माण झाला होता. तथापि लोर्कापण सोहळ्यात मान्यवरांकडून साधा बॅ. ए. आर. अंतुलेसाहेब यांचा नामोल्लेखही न होणे हा प्रकार म्हणजे जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार आहे. महाविकास आघाडीमध्ये सत्तेत असलेली काँग्रेस हा प्रकार कसा खपवून घेत आहे, हे एक प्रश्नचिन्ह आहे. या पुलावर पूर्वी अंतुलेसाहेब यांच्या नावाची पाटी होती. परंतु पुलाची दुरूस्ती करताना ती पाटी काढून टाकण्यात आली व आता त्या ठिकाणी तटकरेसाहेबांच्या नावाची पाटी बसविण्यात आली आहे. हा संतापजनक प्रकार आहे. सत्तेत असणारी सत्ता भोगण्यासाठी या प्रकाराकडे कानाडोळा करत आहे का? कोकणचे भाग्यविधाते अशी अंतुलेसाहेबांची प्रतिमा आजही कोकणवासियांच्या मनात आहे. तसेच पुलाच्या पाटीबाबतचा प्रकार म्हणजे जन्म देणाऱ्या बापाचे नाव खोडून काही वर्षाने संगोपन करणाऱ्या इतरांचे नाव मुलापुढे लावणे असा प्रकार असल्याचा संताप स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त केला जात आहे. आपण त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुले यांच्या नावाची पाटी पूर्वीप्रमाणे लावण्यात यावी तसेच या पुलाला बॅ. ए.आर.अंतुलेसाहेब यांचे नाव देण्यात यावे. राज्य सरकारने अंतुलेसाहेबांच्या नावाविषयी कोकणवासियांची असलेली तळमळ व भावनिक आत्मियता पाहता सावित्री नदीवरील या पुलाला स्व. ए.आर. अंतुले सेतु असे नाव लवकरात लवकर द्यावे. हा पुल अंतुलेसाहेबांमुळे झालेला आहे. अंतुलेसाहेब हे कोकणचे सुपुत्र असून कोकणवासियांची त्यांच्याशी नाळ जोडलेली आहे. या पुलाला अंतुलेसाहेबांचे नाव लवकरात लवकर देण्याविषयी संबंधितांना आदेश द्यावेत या नावाशिवाय अन्य नाव सरकारने दिल्यास संतप्त कोकणवासियांचा उद्रेक होवून रास्ता रोकोसह अन्य प्रकारचे आंदोलन होवून कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर या पुलाला माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुलेसाहेबांचे नाव देण्याचा आदेश देण्याची मागणी हाजी शाहनवाझ खान यांनी केली आहे.