नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लसीकरण अभियान राबविण्याची मागणी शिवसेनेचे विभागप्रमुख व माजी नगरसेवक रतन मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
कोरोना महामारी नियत्रंणात आणण्यासाठी महापालिका प्रशासन करत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. तथापि कोरोनाची दररोज प्रसिध्द होणाऱ्या आकडेवारी नजर टाकली असता आकडेवारी कमी झालेली आता पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाची लस नागरी आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध होत नसून महापालिका रूग्णालयांमध्येही मर्यादीतच डोस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे रहीवाशांना हेलपाटेच मारावे लागत आहे. राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोना संपुष्ठात आणण्यासाठी घरोघरी जावून लस देण्याचे काम सुरू केले आहे. नवी मुंबईत आज लाखोच्या संख्येने लस न मिळणाऱ्यांची संख्या आहे. त्यातच पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्यांना दुसरा डोस घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहे. खासगी रूग्णालयात मात्र कधीही गेल्यावर लस उपलब्ध होते आणि महापालिकेच्या आरोग्य विभागात मात्र हेलपाटे मारूनही लस मिळत नाही. त्यामुळे जनसामान्यात पालिका प्रशासनाप्रती उलटसुलट चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोरोना महामारी संपुष्ठात आणण्यासाठी आपण नवी मुंबई शहरात घरोघरी जावून प्रत्येकाला लस उपलब्ध करून द्यावी की जेणेकरून शंभर टक्के लसीकरणाचे ध्येय साध्य करता येईल. त्यामुळे आमच्या मागणीवर सकारात्मक निर्णय घेवून पालिकेच्या आरोग्य विभागाला घरोघरी जावून लसीकरण देण्याचे आदेश देण्याची मागणी रतन मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.