संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : सिडको महामंडळातर्फे बांधण्यात आलेली ही घरे आजूबाजूच्या परिसरातील घरांच्या किंमतीशी तुलना करता अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत ही उल्लेखनीय बाब आहे. अतिशय उत्तम बांधकाम दर्जा असेलली ही घरे सर्वसामान्यांचा सिडकोवरील विश्वासास अधिक बळकटी देतात. या गृहनिर्माण योजनेस केंद्र सरकारकडून लागू असलेल्या अनुदानाचा भार सिडको महामंडळाने उचलला आहे. १ जुलैपासून घराचा ताबा देण्याचे वचन सिडकोने पाळले आहे, असे उद्गार एकनाथ शिंदे, मंत्री, नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा पालकमंत्री, ठाणे जिल्हा यांनी काढले. सिडको महामंडळाच्या २०१८-१९ महागृहनिर्माण योजनेतील कळंबोली येथील गृहनिर्माण योजनेच्या साईट व्हिजीट प्रसंगी त्यांनी हे उद्गार काढले. या वेळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्यात आल्या.
या साईट व्हिजिटला राजन विचारे, खासदार, ठाणे, डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांची प्रमुख उपस्थिती तर अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको उपस्थित होते.
या साईट व्हिजिट दरम्यान एकनाथ शिंदे यांनी हजारो कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होत आहे, ही आनंदाची बाब असून कोविड-19 च्या काळातही सिडकोतील अभियंते व अधिकाऱ्यांनी घरांचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष पुरविले. केवळ घर बांधणी व विकास प्रकल्प यात मर्यादित न राहता सिडकोने कोविड काळाच्या संकट समयी शासनाच्या निर्देशानुसार विविध ठिकाणी कोविड सेंटर व रूग्णालयाची उभारणी केली हे कौतुकास्पद आहे असे प्रशंसोद्गार काढले.
या वेळी डॉ. संजय मुखर्जी यांनी कोविड-१९ महासाथीच्या काळात उद्भवलेल्या अडचणींवर केलेली मात तसेच अर्जदारांना भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अर्जदारांना दिलासा देणारे निर्णय घेतल्याचा उल्लेख केला. यशस्वी अर्जदारांना सदनिका सुपूर्द करण्याचा हा क्षण वचनपूर्तीचा आनंद देणारा आहे. आजपासून यशस्वी अर्जदारांना घरांचा ताबा टप्याटप्याने देण्यात येईल असेही ते म्हणाले.
सिडकोतर्फे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सन २०१८-१९ मध्ये १४,८३८ घरांची योजना सुरू करण्यात आली. सदर योजने अंतर्गत नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी या ५ नोड्मध्ये ११ ठिकाणी घरे साकारण्यात आली. १४,८३८ घरांपैकी ५,२६२ घरे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर ९,५७६ घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरे १ बीएचके (१ हॉल, १ खोली, १ स्वयंपाकघर, २ स्वच्छतागृहे) प्रकारातील असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध असलेल्या घराचा चटई क्षेत्र २५.८१ चौ.मी. तर अल्प उत्पन्न गटाकरिता असलेल्या घराचा चटई क्षेत्र २९.८२ चौ.मी. इतका आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तळोजा येथे २,८६२, खारघर येथे ६८४, कळंबोली येथे ३२४, घणसोली येथे ५२८ आणि द्रोणागिरी येथे ८६४ घरे उपलब्ध करून देण्यात आली होती. अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा येथे ५२३२, खारघर येथे १२६०, कळंबोली येथे ५८२, घणसोली येथे ९५४ आणि द्रोणागिरी येथे १,५४८ घरे उपलब्ध करून देण्यात आली. या योजनेतील गृहसंकुलांना भारती शास्त्रीय संगीतातील रागांची नावे देण्याची अभिनव कल्पनाही राबविण्यात आली. सदर योजनेची संगणकीय सोडत दिनांक २ ऑक्टोबर २०१८ रोजी यशस्वीरीत्या पार पडली.