नवी मुंबई : नेरूळ सेक्टर 6 मधील सिडको वसाहतीमध्ये पालिका प्रशासनाकडून पावसाळा कालावधीत सातत्याने विशेष धुरीकरण अभियान राबविण्याची मागणी ज्येष्ठ पत्रकार व स्थानिक भागातील रहीवाशी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ सेक्टर सहामध्ये शिवम, हिमालय, सागरदिप, वरूणा, एव्हरग्रीन, सीव्ह्यू, नेरूळ सीव्ह्यू या सिडकोच्या गृहनिर्माण सोसायट्या आहेत. या सोसायट्यापासून हाकेच्या अंतरावरच पामबीच मार्गालगतच खाडी आहे. येथील रहीवाशांना बाराही महिने डासांच्या उद्रेकाचा सामना करावा लागत आहे. सध्या या सिडको वसाहतीमधील सीव्ह्यू उद्यान, राजमाता जिजाऊ उद्यान बंद असून तेथे गवत वाढले आहे. बकालपणा वाढला आहे. त्यामुळे डासांना पोषक वातावरण मिळत आहे. याशिवाय दत्तगुरू सोसायटीच्या टॉवरचे काम सुरू असल्याने व पावसातही तेथे खोदकाम आजही जोरात सुरू असल्याने सभोवतालच्या गृहनिर्माण सोसायट्यांना तेथे साचलेल्या पाण्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. सागरदिप व शिवम सोसायटीच्या मध्यभागी असलेल्या महावितरणच्या विद्युत उपकेंद्राच्या बकालपणामुळे डास वाढीस लागले आहे. एकंदरीत सर्व बाजूने नेरूळ सेक्टर सहामधील सिडको रहीवाशी डासांच्या विळख्यात अडकले असून कोणत्याही क्षणी साथीच्या आजाराचा उद्रेक होण्याची भीती आहे. समस्येचे गांभीर्य पाहता महापालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पावसाळा कालावधीत नेरूळ सेक्टर सहामधील सिडको वसाहतीमध्ये सातत्याने धुरीकरण व अळीनाशकाची फवारणी करण्याचे निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगेपाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.