नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील दर्शन दरबार मार्गावर विक्रम बारनजिक विशिष्ठ धर्मियांकडून प्रार्थनास्थळाच्या नावाने बांधण्यात येणाऱ्या कमानीची (प्रवेशद्वार) परवानगी रद्द करून काम बंद करण्याची मागणी सारसोळे गावचे ग्रामस्थ व महापालिका ब प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी मुख्यमंत्री, नवी मुंबई महापालिका आयुक्त व नेरूळ विभाग अधिकाऱ्यांकडे एका लेखी निवेदनातून केली आहे.
नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर ६ मधील दर्शन दरबार मार्गावर विक्रम बारनजिक आजपासून कमानीचे (प्रवेशद्वार) काम सुरू झालेले आहे. वास्तविक पाहता नवी मुंबईत गावांचे अस्तित्व ठळकपणे दिसावे, गावांची स्वतंत्र ओळख असावी यासाठी महापालिका खर्चाने गावांच्या प्रवेशद्वारावर नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून कमानी (प्रवेशद्वार) बांधण्यात आलेले आहे. तथापि या ठिकाणी बांधण्यात येणारी कमान (प्रवेशद्वार) हे स्वखर्चाने विशिष्ठ एका धर्मियांकडून त्यांच्या प्रार्थनास्थळाच्या नावाने बांधण्यात येत आहे. याप्रकरणी घटनास्थळी व महापालिकेत चौकशी केली असता, या घटकांना महापालिका आयुक्तांनीच त्या ठिकाणी स्वखर्चाने कमान (प्रवेशद्वार) बांधण्यास परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. आज नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात रस्ते आहेत. प्रत्येक धर्माचा, जातीचा, पंथाचा घटक स्वखर्चाने रस्त्याच्या सुरूवातीलच आपल्या प्रार्थनास्थळाच्या नावाने कमान (प्रवेशद्वार) बांधण्याची परवानगी मागेल. एकाला परवानगी दिल्यास त्याच निकषावर इतरांच्याही प्रार्थनास्थळासाठी कमानी (प्रवेशद्वार) स्वखर्चाने बांधण्याची परवानगी द्यावी लागेल. मग या शहराला रस्त्यारस्त्यावर कमानी (प्रवेशद्वार) उभारले गेल्यावर कमानीचे (प्रवेशद्वारांचे) शहर असे स्वरूप येईल. कानाकोपऱ्यात रस्त्यारस्त्यावर कमानी (प्रवेशद्वार) उभारली गेल्यास ज्या ग्रामस्थांच्या, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर ही नवी मुंबई निर्माण झाली, त्या गावांचे स्वतंत्र अस्तित्व व ओळख पुसुन जाईल. कमानींच्या (प्रवेशद्वाराच्या) भाऊगर्दीत गावांच्या कमानी (प्रवेशद्वार) शोधणे अवघड होवून बसेल, असा इशारा मनोज मेहेर यांनी महापालिका प्रशासनाला दिला आहे.
पालिका आयुक्त येतील व जातील; पण चुकीच्या निर्णयामुळे नवी मुंबईतील गावांच्या अस्तित्वाचा, त्यागाचा व ओळखींचा विसर पडण्यास सुरूवात होईल, त्यासाठी हा चुकीचा पायंडा कृप्पा करून पाडू नका. आपण दिलेली परवानगी रद्द करून संबंधित कामास नकार देण्यात यावा अन्यथा प्रत्येक रस्त्यारस्त्यावर कमानी (प्रवेशद्वार) उभ्या राहतील व गावांच्या कमानी पुन्हा लोकांना नव्याने गुगलमॅपवर शोधाव्या लागतील. विषयाचे गांभीर्य समजून घ्या. आधीच विमानतळ प्रकरणामुळे ग्रामस्थांच्या भावनिक अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यातच महापालिका प्रशासनाने स्वखर्चाने प्रार्थनास्थळांच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या कमानींना (प्रवेशद्वार) परवानगी देवून गावाची ओळख पुसण्याचा, अस्तित्व मिटविण्याचा प्रयत्न करून ग्रामस्थांच्या भावनेचा अपमान करू नये. लवकरात लवकर सकारात्मक निर्णयाच्या प्रतिसादाची अपेक्षा आहे. त्यामुळे या कमानीला (प्रवेशद्वार) देण्यात आलेली परवानगी स्थगित करून काम रद्द करण्याच्या नवी मुंबई महापालिका प्रशासनाला सूचना करण्याची मागणी मनोज यशवंत मेहेर यांनी निवेदनातून केली आहे.