नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ -४ तसेच जुईनगर नोडमधील रहीवाशांसाठी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. कोरोना महामारीचे सावट असतानाही आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्या रहीवाशांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होत आपली वैद्यकीय तपासणी करून घेतली. नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत आणि नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी संयुक्तपणे या आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
नेरूळ सेक्टर २ मधील दत्तात्रेय सोसायटीतील कॉंग्रेसच्या कार्यालयात न्यू मिलेनिअम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वुमन्स अॅण्ड चाईल्ड हॉस्पिटल यांच्या माध्यमातून कामगार नेते रवींद्र सावंत यांनी या आरोग्य तपासणी शिबिराचे नेरूळ व जुईनगरमधील रहीवाशांसाठी आयोजन केले होते. कोरोना महामारीचे वाढते प्रमाण, म्युकरकोसिसचे संकट ,डेल्टाची भीती व पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीच्या आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता पाहता स्थानिक रहीवाशांच्या आरोग्य रक्षणासाठी या शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती शिबिराचे आयोजक रवींद्र सावंत यांनी दिली. या आरोग्य शिबिरात स्थानिक परिसरातील महिला, पुरूष व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. युवा वर्गानेही आपल्या आरोग्याबाबत जागरूकता दाखवित शिबिरामध्ये आपली तपासणी करून घेतली.
या शिबिरामध्ये रक्तदाब, रक्तगट तपासणी, रक्त तपासणी, नेत्रतपासणी, मधुमेह, फिजिओथेरिपिस्टकडून सल्ला यासह विविध चाचण्या व तपासण्या उपलब्ध होत्या. शिबिरामध्ये डॉक्टर मनोज उपाध्याय, प्रल्हाद गायकवाड, विजय कुरकुटे, दिनेश गवळी, संध्या कोकाटे, सुमित लंबे, सुदर्शन सावंत, सदाशिव गोधडे, शुभांगी जगताप, सुनीता पिसाळ, राहुल कापडणे आदी सहभागी झाले होते. कोरोना महामारीच्या काळात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या न्यू मिलेनिअम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वुमन्स अॅण्ड चाईल्ड हॉस्पिटलचे कामगार नेते रवींद्र सावंत यांनी आभार मानले.