संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : शहरातील महापालिकेच्या उद्यानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असताच आज रवींद्र सावंत यांनी कामगार शिष्टमंडळासमवेत उद्यान विभागाचे उपायुक्त पवार यांची भेट घेवून रॉक गॉर्डनच्या कामगारांच्या समस्या मांडल्या. उपायुक्त पवार यांनी कामगारांच्या समस्या पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन दिले.
नवी मुंबई महानगरपालिकेतील उद्यान विभागातील कर्मचारी हे इंटकचे सदस्य असून महापालिका प्रशासन दरबारी या कर्मचाऱ्यांच्या समस्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. कंत्राटदारांकडून आजवर या कर्मचाऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली असून त्यांच्या समस्या सोडविण्याबाबत आजतागायत काहीही कार्यवाही झालेली नाही. कर्मचाऱ्यांना साध्या साध्या मुलभुत सुविधांपासूनही आजवर वंचित ठेवण्यात आलेले आहे. कर्मचाऱ्यांना जाणिवपूर्वक सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या व त्यांच्या समस्या सोडविण्यास टाळाटाळ करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर महापालिका प्रशासनाने कारवाई करण्याचीही मागणी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी या बैठकीत केली. काही दिवसापूर्वी सावंत यांनी पालिका आयुक्तांकडेही लेखी निवेदनातून ही मागणी केलेली आहे.
कर्मचाऱ्यांना मागील एक वर्षाचा (२०१९-२०२०) रजा वेतन व दिवाळी बोनस देण्यात आलेला नाही. पावसाळी रेनकोट व गमबुट तसेच गणवेशही मिळालेले नाहीत. कर्मचाऱ्यांना दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्यामध्ये होणारी वाढही कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये अद्यापि समाविष्ट झालेली नाही व कर्मचाऱ्यांना ही वाढ आजतागायत मिळालेली नाही. ई.एस.आय.सी सुविधा आजतागायत या कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली नाही. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये त्यांचा मागील ५ ते ६ महिन्याचा पीएफ जमा करण्यात आलेला नाही. कोरोना महामारीच्या काळात ज्या कर्मचाऱ्यांना कोरोना संक्रमण झालेले आहे, अशा कर्मचाऱ्यांचे आजारपणातील कालावधीतील वेतन कपात करण्यात आलेले आहे. आयुक्तांच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांना या काळातील वेतन मिळालेच पाहिजे. या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतनही देण्यात येत नाही. कोरोना कालावधीत काम केलेल्या कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता तीनशे रूपये त्यांना विनाविलंब देण्यात यावा. श्रीमती वत्सला म्हात्रे, प्रदीप नाईक, रेखा सावंत या कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अद्यापि मिळालेले नाही. श्रीमती वत्सला म्हात्रे तीन महिन्याचा भविष्य निर्वाह निधीचा अद्यापि खात्यात भरणा करण्यात आलेला नाही. वेतन पावती मिळावी व त्यावर भविष्य निर्वाह निधीचा स्पष्टपणे उल्लेख केलेला असावा. उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा व असुविधांचा या निवेदनात स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे. वेतनास विलंब होणे, पीएफचा भरणा न होणे, आरोग्य सुविधा नसणे, पीएफ क्रमांकाबाबत माहिती नसणे या गोष्टी अनाकलनीय व गंभीर असल्याचे सांगत कामगार नेते सावंत यांनी तात्काळ कर्मचाऱ्यांच्या समस्या व असुविधांवर गांभीर्याने विचार करून सकारात्मक प्रतिसाद देण्याची मागणी या बैठकीत केली.