संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ : ९८२००९६५७३
Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com
विठूमाऊली भक्तांसाठी भजनाचा आस्वाद आणि आरतीचे थेट प्रक्षेपण
पनवेल : आषाढी एकादशीनिमित्त २० जुलै रोजी ‘अवघे गर्जे पंढरपूर’ या धार्मिक कार्यक्रमाचा थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून भक्तगणांना लाभ घेता येणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे तालुकाध्यक्ष पंडित उमेश चौधरी आणि तालमणी पंडित प्रतापराज पाटील प्रथमच हे दोन दिग्गज कलाकार एकत्रितपणे कार्यक्रम सादर करणार आहेत.
आषाढी एकादशी म्हणजे भगवान विठ्ठल भक्तांसाठी दीपावली सणच असतो. या दिवशी सर्व वारकरी मंडळी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरात गोळा होतात. वारकरी भक्तगण या दिवसाची आतुरतेने वाट पहात असतात. अवघ्या पंढरपूरात विठूनामाचा गजर होत असतो. परंतु या वर्षीही कोरोना महामारीमुळे वारी शासनाने रद्द केली आहे. तरी सर्व भक्तमंडळींना भजन, आरती व दर्शनाचा लाभ व्हावा म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मल्हार टिव्ही व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून २० जुलै रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.
पंडित उमेश चौधरी व पंडित प्रतापराज पाटील यांना तबला साथ कुणाल पाटील, गायनसाथ मंगेश चौधरी व अक्षय चौधरी, तर सुप्रिया जोशी यांची संवादिनीची साथ लाभणार आहे. या भक्तीमय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उस्ताद अजीम खान करणार आहेत. ते भक्तांसमोर संगीतामधून वारीचे महत्व अधोरेखित करणार आहेत. मागील वर्षीही अशाच प्रकारे ‘विठू नामाचा गजर’ करून भक्तगणांना दर्शनाचा लाभ देण्यात आला होता. त्यावेळी १६६७८ भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने लाभ घेतला होता. त्या अनुषंगाने या वर्षीही हा भक्तीमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.