संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिनी जासई येथे मशाल मोर्चा काढण्याचा निर्णय पनवेल येथे झालेल्या समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
१० जूनला भव्य साखळी आंदोलन आणि त्यानंतर २४ जून रोजी झालेल्या सिडको घेराव आंदोलनात लाखो भूमिपुत्रांच्या प्रत्यक्ष साक्षीने १५ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारला मुदत देण्यात आली. त्यानंतर विमानतळाचे काम बंद करण्याचाही इशारा दिला आहे. या आंदोलनाची पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी नुकताच पनवेल येथील ज्योतिबा महात्मा फुले हॉलमध्ये (आगरी समाज सभागृह) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने ९ ऑगस्ट या क्रांती दिनी दि. बांचे जन्मगाव असलेल्या जासईमध्ये मशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीला समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी खासदार जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, अतुल पाटील, संतोष केणे, गुलाबराव वझे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील, नंदराज मुंगाजी, के. के. म्हात्रे, ऍड. मदन गोवारी, दीपक म्हात्रे, सीमा घरत, तसेच समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.
पाचवेळा आमदार, दोन वेळा खासदार, विरोधी पक्षनेते, नगराध्यक्ष अशी दमदार कारकीर्द कामगिरी दि. बा. पाटील यांची राहिली आहे. आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधीमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौम संसदेत शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक जनलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक राहावी यासाठी नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी विविध पक्ष, सामाजिक संघटनांनी तसेच भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, ही २००८ सालापासूनची मागणी असून दिबासाहेबांच्या नावासाठी लढा अधिक व्यापक करण्यात येणार आहे.