संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३
Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmail.com
नवी मुंबई : नेरूळ पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या रेल्वे रूळावरील राजीव गांधी उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची लेखी मागणी शिवसेनेच्या प्रभाग ८७च्या माजी नगरसेविका सुनिता मांडवे यांनी महापालिका आयुक्त अभिजत बांगर यांच्याकडे लेखी निवेदनातून केली आहे.
नेरूळ पश्चिमेला सेक्टर २ व ८ आणि नेरूळ पूर्वेला शिरवणे गाव आणि नेरूळ सेक्टर ३ या परिसराच्या मधून रेल्वे रूळावरून राजीव गांधी उड्डाणपुल आहे. या पुलाची दुरावस्था झालेली असून मुसळधार पावसात पुलाची पडझड होण्याची भीती स्थानिक रहीवाशांकडून व वाहनचालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. राजीव गांधी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट होणे आवश्यक आहे. सध्या पावसाळ्यात पुल पडल्याच्या, भिंती कोसळल्याच्या, दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. राजीव गांधी उड्डाणपुलाच्या बांधकामाला जवळपास ४ दशकाचा कालावधी लोटलेला आहे. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होवू नये यासाठी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने करणे आवश्यक आहे. समस्येचे गांभीर्य पाहता महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर राजीव गांधी उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची मागणी माजी नगरसेविका सुनिता मांडवे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.