नवी मुंबई : सातत्याने कामगार वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी व कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील इंटक महापालिका ते मंत्रालय, विधानभवन, अधिवेशनातही पाठपुरावा केला जात असल्याने नवी मुंबई महापालिकेतील कामगार वर्गामध्ये इंटकचे आकर्षण वाढीस लागले आहे. महापालिकेच्या वाहन विभागातील वाहनचालकांनी महापालिका मुख्यालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात जाहिरपणे इंटकमध्ये प्रवेश केला. यावेळी कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत, राजन सुतार, कृष्णा घनवट, चव्हाण, इंटकचे नवी मुंबई उपाध्यक्ष प्रल्हाद गायकवाड, दिनेश गवळी उपस्थित होते.
कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे कामगाराच्या कायम सेवेबाबत, समान काम समान वेतन यासह अनेक ठराव नवी मुंबई महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविले आहेत. ठोक मानधनावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या कायम सेवेबाबत रवींद्र सावंत यांनी महापालिका तसेच महाविकास आघाडीतील अधिकाधिक मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. भेटीगाठी घेतल्या आहेत. इंटकच्या कार्यप्रभावामुळे याअगोदरच महापालिकेच्या 23 नागरी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, परिचारिका, औषधनिर्माते, प्रथम संदर्भ रूग्णालयातील सफाई कामगार, आया, वॉर्ड बॉय, मावशी व अन्य कामगारांनी इंटकमध्ये प्रवेश केला आहे. आता कायम सेवेतील वाहन चालकांनीही इंटकचे सदस्यत्व स्विकारल्यामुळे महापालिका वर्तुळात कामगारांमध्ये इंटकची ताकद वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे.